हॉस्पिटलच्या अनियमित बांधकामांवरील कारवाईच्या स्थगितीस कोर्टाचा नकार

0

महापालिकेला नोटीस; 7 सप्टेंबरला एकत्रित सुनावणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील हॉस्पिटलच्या अनियमित बांधकामावरील कारवाईच्या स्थगितीस औरंगाबाद खंडपीठाने आज नकार दिला आहे. त्यामुळे हॉस्पिटलवर कारवाईची मोहीम सुरू ठेवण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थगिती मिळावी अशी मागणी करणार्‍या डॉक्टरांच्या वैयक्तिक याचिका मूळ जनहित याचिकेत विलीन करून त्याची एकत्रित सुनावणी 7 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान खंडपीठाने महापालिकेला सुनावणीस उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.

शाकीर शेख यांच्या जनहित याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने शहरातील हॉस्पिटलच्या नियमबाह्य बांधकामांवर कारवाईचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने हॉस्पिटलच्या अनियमित बांधकामावर हातोडा टाकण्यास सुरूवात केली. मात्र या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. शंकर शेळके, डॉ. बडे, डॉ. प्रकाश गरूड यांनी वैयक्तिक याचिका खंडपीठात दाखल केल्या.

त्यावर आज बुधवारी न्यायमूर्ती सांबरे, केमकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. डॉक्टरांच्यावतीने अ‍ॅड. विनायक दिक्षित यांनी बाजू मांडली. शाकीर शेख यांनी यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला असल्याने त्यांच्यावतीने अ‍ॅड. मुकुल कुलकर्णी यांनी बाजू मांडली. खंडपीठाने डॉक्टरांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर डॉक्टरांच्या स्वतंत्र याचिका या मूळ जनहित याचिकेसमवेत एकत्र करून 7 सप्टेंबरला एकत्रित सुनावणी ठेवली असून कारवाईस स्थगिती देण्यास नकार दर्शविला.

दरम्यान महापालिकेने नव्याने 13 हॉस्पिटलला नोटिसा दिल्या असून अनियमित बांधकाम काढण्यास पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. मुदतीनंतर बांधकाम न काढल्यास महापालिका हातोडा टाकणार आहे. बुधवारी महापालिकेच्या पथकाने हॉस्पिटलचे अनियमित बांधकाम काढण्यास सुरूवात केली. बांधकाम पाडण्यासाठी 40जणांचे पथक निर्माण नेमण्यात आले आहे.

शहरात 121 हॉस्पिटलचे बांधकाम हे नियमबाह्य आहे. त्यातील 52 हॉस्पिटलला महापालिकेने पहिल्या टप्प्यात अंतिम नोटिसा बजावल्या असून त्यातील 18 हॉस्पिटलवर कारवाई पूर्ण केली आहे. दुसर्‍या टप्प्यात 32 हॉस्पिटलला अंतिम नोटिसा बजावल्या असून नव्याने 13 हॉस्पिटलला नोटीस इश्यू केल्या. या 13 हॉस्पिटलला बांधकाम स्वत:हून काढण्यास 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*