Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

घरगुती वीज वापरासाठी लवकरच प्रिपेड सुविधा; केंद्रीय ऊर्जामंत्र्यांची घोषणा

Share

राज्यांत गरीबांना मोफत वीज ?

नवी दिल्ली – घरगुती वीज वापरासाठी प्रिपेड सुविधा देशभरात लागू करण्यात येणार आहे. वीज वापरानंतर पैसे भरण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात होणार आहे. त्यासाठी देशभरातील घरांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. घरात पंखे, दिवे, एसी आणि इतर वीजेवर चालणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यासाठी आता ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना वीज पुरवठा होणार आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी या योजनेबाबत सांगितले की, भारत आता वीज क्षेत्रात एक नवी व्यवस्था निर्माण करु पाहत आहे, यामध्ये वीज ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागतील त्यानंतरच त्यांना वीज वापरता येणार आहे.

तसेच राज्यांना समाजातील गरीब वर्गाला मोफत वीज देण्याचा पर्यायही खुला असणार आहे. मात्र, यासाठी त्यांना आपल्या बजेटमधून वीज वापराचे पैसे भरावे लागतील. अमर उजालाने याबाबत वृत्त दिले आहे.

वीज निर्मितीसाठी मोठा खर्च होत असतो, त्यामुळे ग्राहकांनी यापुढे वीज वापरानंतर पैसे देता येणार नाहीत तर आधीच पैसे दिल्यानंतर वीज वापरता येईल. गुंतवणूक केल्याशिवाय तुम्हाला वीज निर्मिती करता येत नाही. त्यामुळे मोफत वीज असा काहीही प्रकार नसतो. त्यामुळे राज्य सरकारांनी जरी जनतेला मोफत वीज देण्याचे आश्वासन दिलेले असले तरी या आश्वासनांची पूर्तता करताना त्यांनी आपल्या बजेटमधून वीजेचा खर्च करावा, असेही सिंह यांनी म्हटले आहे.

या प्रिपेड योजनेसाठी केंद्र सरकारने 2022चे लक्ष्य निश्चित केले आहे. यानंतर लोकांना आपल्या घरांमध्ये वीज मीटर रिचार्ज केल्याशिवाय वीज वापरता येणार नाही. यासाठी ग्राहकांना मोबाईल फोन प्रमाणे वीज रिचार्ज करावी लागेल. हे रिचार्ज संपल्यानंतर आपोआपच ग्राहकांच्या घरातील वीज पुरवठा बंद होऊन जाईल. त्यासाठी स्मार्ट प्रिपेड वीज मीटर्सचे उत्पादन वाढवून त्याचा पुरवठा वाढवण्याचा सल्ला उत्पादकांना देण्यात आला आहे. कारण येणार्‍या काळात याला मोठी मागणी असणार आहे. त्यानंतर येत्या तीन वर्षात सर्व घरांमध्ये स्मार्ट प्रिपेड मीटर असतील, असेही ऊर्जा मंत्री सिंह यांनी म्हटले आहे.

प्रिपेड मीटरचे असे आहेत फायदे

प्रिपेड मीटरमुळे ग्राहकांना घरपोच बील पाठवण्याची कटकट संपेल. वीज कंपन्यांवर थकीत वीजबीलांचा भार राहणार नाही. त्याचा परिणाम म्हणजे वीज कंपन्यांची स्थिती सुधारेल. त्यामुळे ही सेवा अधिकाधिक सक्षम होण्यास मदत होईल. यामुळे खर्‍या अर्थाने वीज क्षेत्रात क्रांती येईल.

मोबाईलच्या मदतीने होणार रिचार्ज
लोक आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून आपल्या वीज मीटरला रिचार्ज करु शकतील. त्यामुळे वीज कंपनीचे कर्मचारी बिलिंग आणि कलेक्शनची कामे करणार नाहीत. त्याचबरोबर या कर्मचार्‍यांना मीटरचे रिडिंग घेण्यासाठीही घरोघरी पाठवण्यात येणार नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!