Type to search

होळी : झाडांची कत्तल नको..!

Share

आदर्श परंपरा, चालीरिती जपल्याच पाहिजे, मात्र मूळ उद्देशाला तिलांजली देत काही हौशी मंडळी केवळ करमणूक व मौज म्हणून सणोत्सवाला वेगळेच वळण देण्याचा अनाठायी प्रयत्न करतात. असे काही व्हायला नको. याचाच एक भाग म्हणजे होळीसाठी चोरी-चोरी, छुपके-छुपके लहान-मोठ्या वृक्षांची सर्रास कत्तल करण्यास मागे-पुढे पाहिले जात नाही. खरेतर बेसुमार वृक्षतोडीमुळे हिरवाईने नटलेली जंगले नष्ट होत आहेत, याचाही विचार व्हावा…

नाशिक। चंद्रकांत वाकचौरे

शेकडो वर्षांची परंपरा जपत होळीचा सण दरवर्षी आनंदाने साजरा होत आहे. घराच्या अंगणांसह गावोगाव अन् शहरांमध्येही होळी पेटवून बुरसटलेल्या विचारांतून येणार्‍या अनिष्ट रुढी, परंपरा व कुविचारांची राखरांगोळी करण्याचा संकल्प या औचित्याने यंदाही केला जाणार आहे. आदर्श परंपरा, चालीरिती जपल्याच पाहिजे, मात्र मूळ उद्देशाला तिलांजली देत काही हौशी मंडळी केवळ करमणूक व मौज म्हणून सणोत्सवाला वेगळेच वळण देण्याचा अनाठायी प्रयत्न करतात. असे काही व्हायला नको.

याचाच एक भाग म्हणजे होळीसाठी चोरी-चोरी, छुपके-छुपके लहान-मोठ्या वृक्षांची सर्रास कत्तल करण्यास मागे-पुढे पाहिले जात नाही. खरेतर बेसुमार वृक्षतोडीमुळे हिरवाईने नटलेली जंगले नष्ट होत आहेत. त्याजागी सिमेंट काँक्रिटची आधुनिक जंगले उभी राहत आहेत. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असून निसर्गाचा समतोल बिघडत आहे.

यात वायुप्रदूषाची भर पडते ती वेगळीच. दिवसेंदिवस पृथ्वीभोवतीचा ओझोनचा थर विरळ होत असल्याने सूर्याची प्रखर किरणे जमिनीवर येत आहेत. दरवर्षी तापमानाचा पार कमालीचा वर चढत आहे. तप्त उन्हाने अवघी सृष्टी लाही-लाही होत आहे. अगदी हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दाही दिशा कराव्या लागतात.

नाशिक जिल्ह्याची परिस्थिती यापेक्षा फारशी वेगळी नाही. येथे धरणांची संख्या मोठी असली तरी काही गावांत अक्षरशः ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ असे वास्तव समोर येते. ही बिकट पार्श्वभूमी लक्षात घेता वृक्षारोपण मोहीम राबवून निसर्गाची जोपासना केली जावी. वृक्षवल्लीमुळे पावसाचे प्रमाण वाढते.

म्हणून वृक्षतोड न होता त्यांचे जतन होणे काळाची गरज आहे. होळी सणानिमित्त काही उत्साही मंडळींकडून होणारे वृक्षतोडीचे प्रकार नवे नाहीत. या पार्श्वभूमीवर सण साजरा झालाच पाहिजे अन् निसर्गाची जोपसनाही झाली पाहिजे, असा सुवर्णमध्य साधणे काळाची गरज आहे.

काही गावांमध्ये रात्रीच्या वेळी घरासमोर, शेतात, अंगणात ठेवलेली लाकडे पळवून नेऊन ती होळीत टाकण्याचे प्रकार घडतात. यावरून ऐन सणोत्सवात वाद निर्माण होतात. असे प्रकार घडू नये यासाठी एक पाऊल पुढे येऊन जनजागृती करूया.. सणोत्सव गुण्यागोविंदाने साजरे करूया एवढेच!

Leave a Comment

error: Content is protected !!