कोपरगाव : बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचा मृत्यू

0
साईश्‍वरला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आ. स्नेहलता कोल्हे, युवानेते आशुतोष काळे, पंचायत समिती सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे आदींनी सर्वोतोपरी मदत केली,मात्र साईश्‍वरला वाचविण्यात त्यांना यश आले नाही.

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील मुर्शतपूर येथील शेतमजूर प्रमोद बारहाते यांचा आठ वर्षाचा साईश्‍वर सोमवारी सकाळी 11.30 शेतातील उघड्या बोअरवेलमध्ये 15 ते 16 फूट खोल खाली पडला. त्याला वाचविण्यासाठी सायंकाळी 7 वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आठ तासानंतर त्याला कुपनलिकेतून बाहेर काढण्यात यश मिळाले.

बेशुद्धावस्थेत असलेल्या साईश्‍वरला उपचारासाठी तात्काळ शिर्डी येथील साईनाथ हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शर्थीचे प्रयत्न करूनही साईश्‍वरला वाचविण्यात यश आले नाही.
प्रमोद बारहाते यांनी मुर्शतपूर येथील उद्धवराव जीवराज देवकर यांची जमीन एक वर्षापूर्वी बटाईने करायला घेतली. मोलमजूरी करुन हे कुटूंब आपला उदरनिर्वाह करीत असे. शेतात मका पिक काढणीचे काम चालू होते. शेळ्या मका पिकाचे दाणे खात होते म्हणून साईश्वर या शेळ्यांना हाकलत होता.

त्याचवेळी साईश्वरचा शेतातील उघड्या कुपनलिकेत तोल गेला. तो 15 ते 16 फूट खोल खाली पडला. त्याच्याबरोबर असणारी समिक्षा हिने आरडाओरडा केला. मदतीसाठी हाका मारल्या तेंव्हा प्रमोद बारहाते हे धावत धावत त्या ठिकाणी आले व त्यांनी ताबडतोब प्रसंगावधान राखून एक बांबू आणला चिमुकल्या साईश्वरने बांबुला धरले, परंतु त्याच्या चिमुकल्या हाताला जास्त वेळ बांबू धरता आला नाही तो बांबू सटकला व तो आणखी पाच फूट खाली गेला.

कुपनलिकेतून मुलाच्या रडण्याचा आवाज सुमारे तासभर चालू होता वडिलांनी शेजारी पाजार्‍यांना हाका मारल्या गांव गोळा झाले पण या कुपनलिकेतून या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न तोकडे पडले.
विजय जाधव, पोलीस पाटील निळकंठ रणशूर यांनी प्रथम तहसिलदार किशोर कदम, पोलीस निरिक्षक सुरेश शिंदे यांना कळवले. त्यांची यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कुंदन गायकवाड व त्यांचे पथक धावून आले.

त्यांनी या कुपनलिकेत अडकलेल्या मुलासाठी ऑक्सीजनच्या नळकांड्यांनी मुलास ऑक्सीजन पुरवला. पंधरा ते वीस मिनीटांत संजीवनी कारखान्याचा दोन जेसीबी घटनास्थळी आले. त्यांनी या कुपनलिकेच्या आजूबाजूस खंदायला सुरुवात केली. या कुपनलिकेभोवती खडक असल्याने तो फुटता फुटेना. एक तासाभरानंतर दोन पोकलँन मशिन आले त्यांनी या कुपनलिकेच्या अवतीभोवती उकरायला सुरुवात केली.

सकाळी 11.30 ते सायं. 7 वाजेपर्यंत साईश्वरला वाचवण्यासाठी प्रयत्न चालू होते.नगर येथील आपत्ती विरोधक कृतीदलाची तुकडी दुपारी 4 वाजता पोहोचली. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास या प्रयत्नांना यश आले. कुपनलीकेतून बेशुध्द अवस्थेत साईश्‍वरला बाहेर काढले. त्याला तात्काळ शिर्डी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आठ तास मृत्युशी झुंज चिमुरडा देऊ शकला नाही. आ. स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते आशुतोष काळे, पंचायत समिती सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी सभापती सुनिल देवकर,रामदास शिंदे, कर्मवीर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन रोहमारे, सरपंच विनित शिंदे रोहिदास होन, संचालक आप्पासाहेब दवंगे,नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी साईश्‍वरला वाचविण्यासाठी शेवटपर्यंत कसोसीने प्रयत्न केले.

मात्र त्याला वाचविण्यात त्यांना यश न आल्याने सर्वांचे मने हेलावून गेले. साईश्वर कुपनलिकेत पडला त्या अगोदर त्याची आई टायफॉईडने आजारी होती. तीस दवाखान्यात दाखल केले होते. आजोबा कांदे विकायला बाजार समितीत गेले तर प्रमोद बारहाते व त्याची आई सुमनबाई, संगिता निकम हे मका सोंगण्याचे काम करीत असताना ही घटना घडली. दरम्यान डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर कोपरगाव ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शोकाकूल वातावरणात मुर्शतपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

*