Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

हिवरगाव पावसा टोलनाका कर्मचार्‍यावर चाकूहल्ला; पाच अटकेत

Share

संगमनेर (तालुका प्रतिनिधी) – किरकोळ कारणाचे निमित्त करून संगमनेरमधील आठ ते दहा जणांनी थेट टोलनाक्यात घुसून दोघांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी हिवरगाव पावसा टोलनाक्यावर घडली. या मारहाणीत एका कर्मचार्‍याला गंभीर दुखापत झाली असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मारेकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. काल मंगळवारी तालुका पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगावपावसा टोलनाका येथे सोमवारी दुपारी 3.40 वाजण्याच्या सुमारास टोल बूथकडे पुण्याकडून एक मालट्रक आला. नियमानुसार त्याने रांगेतून टोलबूथकडे येऊन टोल भरणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता संबंधित ट्रकच्या चालकाने अनधिकाराने दादागिरी करीत आपल्या ताब्यातील ट्रक टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करुन तसाच पुढे नेला व टोलनाक्यावरील लोखंडी दांड्याला (अ‍ॅटो बॅरिअर) धडक देत तो तोडला. त्याच्या या कृत्याचा टोलनाक्यावरील कर्मचारी शैलेश फटांगरे (रा. वरुडी पठार) याने जाब विचारला असता ट्रकचालकाने त्याच्याशी हुज्जत घातली.

काही वेळाने समजूतदारीने टोलनाका कर्मचार्‍यांनी त्या शाब्दिक वादावर पडदा टाकला. सर्वकाही सुरळीत होत असताना काही वेळातच संगमनेरातून आठ ते दहा इसमांनी तेथे येऊन शिवीगाळ करीत धुडगूस घालण्यास सुरुवात केली. यावेळी चौथ्या क्रमांकाच्या टोलबूथवर सेवेत असलेल्या नवनाथ अप्पासाहेब घुले (रा. मालदाडरोड, संगमनेर) यांच्या टोल कक्षाच्या दिशेने आठ ते दहा गुंडांनी धावत जाऊन त्यांना बाहेर खेचले व त्या सर्वांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी जावेद शेख नावाच्या इसमाने त्याच्या हातातील चाकूसारख्या धारदार हत्याराने घुले यांच्यावर वार करुन त्यांना गंभीर दुखापत केली व अन्य आरोपींनी त्याचे डोके धरून त्याला लोखंडी बॅरिकेटवर आदळण्याचा व जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मोठा आरडाओरड झाल्याने बाजूच्या टोलबूथवर सेवेत असलेल्या शैलेश फटांगरे याने तेथे धाव घेतली असता सदर लोकांनी त्यालाही बेदम मारहाण केली. यावेळी टोलनाक्यावरील सर्व कर्मचारी जमा होऊ लागल्याने जवळपास अर्धातास प्रचंड धुडगूस घालून दहशत निर्माण करून मारेकरी संगमनेरच्या दिशेने पळून गेले. यानंतर तेथील अन्य कर्मचार्‍यांनी जखमी अवस्थेतील त्या दोघा कर्मचार्‍यांना रुग्णवाहिकेतून संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शैलेश फटांगरे याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला सोडून देण्यात आले, तर नवनाथ घुले यांच्यावर धारदार चाकूने वार झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची तक्रार रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली नव्हती. तर दुसरीकडे या प्रकरणाचे व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल झाले, हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणार्‍या मारेकर्‍यांची हिम्मत पाहून हे सुसंस्कृत संगमनेर शहर हे पोषक नसल्याचे समजून येते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रात्री ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी आम्ही सोबत आहोत असे सांगत जखमींना धीर दिला व तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार घटनेनंतर तब्बल आठ तासांनी या हल्ल्यात जखमी झालेल्या नवनाथ अप्पासाहेब घुले यांची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली.

या फिर्यादीनुसार तालुका पोलिसांनी शहबाज नजीर इनामदार, जावेद अब्दुल रज्जाक शेख, आवेश अजीज अलील शेख, मुस्तफा मुक्तार पठाण उर्फ बाबू व मजहर युनूस सय्यद यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहे.तर या प्रकरणात परस्पर विरुद्ध तक्रार जावेद अब्दुल रज्जाक शेख यांनी दाखल केली आहे. त्यामध्ये साईनाथ फटांगरे, लेणे व आणखी एक जण यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!