जिल्ह्यातील एड्सचे प्रमाण घटले एचआयव्हीग्रस्त शिशूंचे प्रमाण शून्यावर

0

नाशिक | दि. ३० प्रतिनिधी – एचआयव्ही एड्सचे नाव घेतले तरी अनेकांच्या मनात भीतीचा गोळा येतो. परंतु शासन व कर्मचार्‍यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या परिणामी जिल्ह्यातील एड्सग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली आहे. मागील पाच वर्षांत हे प्रमाण २.५ वरून ०.९ टक्क्यांवर आले आहे.

यासह एचआयव्हीग्रस्त गरोदर मातांंपासून बालकांना होणार्‍या संसर्गाचे प्रमाण शून्यावर आणण्यात नाशिक जिल्हा आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. जिल्ह्यात यंदा एकही असे शिशू आढळले नाही ज्यास एचआयव्हीग्रस्त मातेपासून एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे.

मागील पाच वर्षांत सरासरी ५ ते ६ शिशूंना आपल्या मातांपासून एसआयव्हीचा संसर्ग होत होता. पाच वर्षांपूर्वी २०१३ मध्ये हे प्रमाण ९ इतके होते. परंतु जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक आणि सामाजिक संस्था यांच्या प्रयत्नांमुळे यावषार्र्त एकही असे बालक आढळून आलेले नाही.

जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणाखाली एकूण २५४ एचआयव्ही तपासणी तसेच औषधोपचार करणारी केंद्रे कार्यान्वित आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र १०४ आहेत. तर प्रमुख ५ सामाजिक संस्था जिल्ह्यात एचआयव्ही नियंत्रणासाठी विविध उपक्रम वर्षभर राबवत असतात. यामध्ये मॅग्मो वेल्फेअर, बागलाण सेवा समिती, उनराग शिक्षण प्रसारक मंडळ, डॉट सामाजिक संस्था, प्रवरा मेडिकल ट्रस्ट व मनोमिलन संस्था कार्यान्वित आहेत.

शासनाने १७ जुलैपासून ट्रिट ऑल हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये तपासणीत एचआयव्ही आढळून आला की त्या रुग्णावर लगेच औषधोपचार सुरू केले जात आहेत. यापुर्वीच्या इतर तपासण्या व इतर कारणाने औषोधपचारासाठी होणारा विलंब कमी करण्यात आला आहे. तसेच झालेल्या जनजागृतीमुळे सर्व एचआयव्हीग्रस्त लोक आता नियमित एआरटी घेत आहेत.

रोगनिदान झाल्याबरोबर उपचार सुरू केले, नियमित तपासणी ठेवली आणि उपचारात सातत्य ठेवलं तर अनेक पातळ्यांवर आश्चर्यकारक सुधारणा दिसून येते. या सर्वाच्या परिणामी जिल्ह्यातील एचआयव्ही ग्रस्तांचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. हे प्रमाण २.५ टक्क्यांवरून आता ०.९ टक्क्यांवर आले आहे. गरोदर मातांचे प्रमाण ०.४८ वरून ०.०२ वर आले आहे. शिशुंचे प्रमाण ९ वरून ० वर आणण्यात यश आले असल्याची माहिती जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिंबंधक पथकाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी यांनी दिली.

ट्रिट ऑलचा लाभ
एचआयव्ही नियंत्रणात आणण्यासाठी १ जुलैपासून शासनाने ट्रिट ऑल हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये एचआयव्ही तपासणीत रुग्ण संशयित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यास लगेच औषधोपचार (एआरटी) सुरू केला जातो. परिणामी सीडी फोर पेशी वाढतात त्यामुळे आगंतूक जंतूंचा शिरकाव होत नाही. रोगाची लक्षणे कमी होतात. एकंदर आरोग्य सुधारते. आयुर्मर्यादा वाढते. रुग्ण कार्यक्षम जीवन जगू शकतो. सध्या आपल्या देशात १० वर्षांहून अधिक काळ सातत्याने उपचार घेऊन सर्वसामान्य जीवन जगणारे असंख्य रुग्ण आहेत.
– डॉ. सुरेश जगदाळे,
जिल्हा शल्यचिकित्सक

LEAVE A REPLY

*