हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेला पिंप्री सद्रोद्दीनच्या बाबांचा उरूस
Share

जाकीर शेख | घोटी
नाशिक जिल्ह्यातील हजारो हिंदू मुस्लिम भाविकांचे ऐक्य घडवून आणणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सद्रोद्दीन येथील पिर शहंशाह सद्रोद्दीन बाबा यांचा उरुस 19 ते 21 सप्टेंबरपर्यंत होत आहे.
या महत्वपूर्ण उरुसानिमित्त पूर्वतयारीला वेग आला आहे. ग्रामपंचायत, पंच कमिटी, पोलीस प्रशासन, भाविक, ग्रामस्थ यांच्या समन्वयाने उरुसाचा रोमहर्षक सोहळा आकर्षण ठरणार आहे. उरुसानिमित्त विविध कार्यक्रमांचा भाविकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन पिर शहंशाह सद्रोद्दीन बाबा दर्गा ट्रस्टतर्फे आरिफ अब्दुल रहेमान जहागीरदार यांनी केले आहे.
गत 650 वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सद्रोद्दीन ह्या गावात पिर शहंशाह सद्रोद्दीन बाबा यांचा उरूस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दर्गेमध्ये भाविकांनी श्रद्धेने बोललेला नवस पूर्ण होतो अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. उरूसप्रसंगी नवसपूर्ती करण्यासाठी हजारो भाविक हजेरी लावतात. उरूसकाळात पूर्वीपासून दुधाची विहीर मानल्या जाणाऱ्या विहिरीत दूध पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. बाबांनी जनकल्याणासाठी पिंप्री सद्रोद्दीन येथे जिवंत समाधी घेतल्याचे गावकरी सांगतात.
हिंदू आणि मुस्लिम भाविकांच्या सामाजिक एकत्रीकरणासाठी बाबांनी अविरत प्रयत्न केले. त्यानुसार 650 वर्षांपासून राज्यभरातील हजारो हिंदू मुस्लिम भाविक उरुसात श्रद्धेने सहभागी होतात. प्रचंड गर्दी असूनही कुठलीही अनुचित घटना घडत नाही. गुण्यागोविंदाने हिंदू मुस्लिम नागरिक येथे दर्गेमुळे राहतात.
यावर्षी गुरुवारी उरुसाच्या पहिल्या दिवशी 19 तारखेला भव्य संदल सोहळा, दुसऱ्या दिवशी 20 तारखेला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, सायंकाळी पीके ग्रुपतर्फे नामांकित कव्वालीकार जुनेद सुलतानी यांच्या कव्वालीचा कार्यक्रम तर शेवटच्या दिवशी 21 तारखेला दर्गेत “धुमाळ” हा महत्वाचा धार्मिक कार्यक्रम आणि कुस्त्यांचे भव्य सामने आयोजित करण्यात आले आहेत. शेवटच्या दिवशी 22 तारखेला सबजाली बाबांची संदल होऊन उरूस संपन्न होईल.
या कार्यक्रमासाठी रोज हजारो भाविक उपस्थित राहतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर दुकानांची गर्दी, मनोरंजक कार्यक्रम, बालकांसाठी विविध मनोरंजन साधने यांची रेलचेल वाढली आहे.
राज्यभरातील सर्वधर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असणारे पिर शहंशाह सद्रोद्दीन बाबा यांचा उरुस उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन पूर्ण झालेले आहे. भाविकांनी उरूसकाळात नियोजित कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा.
– बद्रोद्दीन शेख, भाविक
सामाजिक एकता जपणाऱ्या पिंप्री सद्रोद्दीन येथील उरूस सर्व समाजांना दिशादर्शक आहे. उत्सवकाळात पोलीस प्रशासनाने गर्दी, वाहने, दर्शनरांगा आदींचे उत्तम संयोजन केले आहे. भाविकांनी कायद्याचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.
– अशोक रत्नपारखी, पोलीस निरीक्षक इगतपुरी.