देवळालीतील कलावंतांची हिंदी चित्रपट निर्मिती

0

नाशिक (संजय लोळगे)| देवळाली कॅम्प येथील रहिवासी व आर्मी पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत असलेले राजू संसारे या चतुरस्त्र कलावंताने दिग्दर्शनासह कथा, पटकथा व संवाद अशा बहुविध जबाबदार्‍या लिलया पेलत पुर्ण लांबीचा ‘मेहरूनीसा’ हा रोमँटिक हॉरर हिंदी चित्रपट तयार केला असून तांत्रिक बाबी पुर्ण झाल्यावर तो प्रदर्शित होणार आहे.

देवळाली कॅम्प शहराने चित्रपटसृष्टीवर कायम भुरळ घातली आहे. दिलीपकुमार, विनोद खन्ना, दिलीप कुलकर्णी, अर्जुन रामपाल, अर्शद वारसी, भूमिका चावला अशा कितीतरी दिग्गज कलावंतांचा या शहराशी असलेला संबंध दृढ आहे. लष्करी प्रशिक्षण केंद्र, टुमदार सॅनेटोरियम आणि निसर्गरम्य वातावरण या जमेच्या बाजू असल्याने चित्रिकरणासाठी या शहरासह परिसरातील विविध ठिकाणांना प्राधान्य दिले जाते.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत गुजराण करणार्‍या संसारे या गुणी कलावंताला बालपणापासूनच चित्रपटाचे विशेष आकर्षण असल्याने तारूण्यात राज्य नाट्य व कामगार कल्याण स्पर्धेतील नाटकांत भूमिका केल्या. अभिनय-दिग्दर्शन याबाबतीत मनोजकुमार यांचा त्यांच्यावर प्रभाव असून अनेक शॉर्ट फिल्मसुद्धा तयार केलेल्या आहेत.
कविराज फिल्म प्रॉडक्शन या बॅनरखाली ‘मेहरूनीसा’ या चित्रपटाचे चित्रिकरण केवळ ३० दिवसांत पूर्ण करून संसारे यांनी अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रिकरण नाशिकसह देवळाली कॅम्प व सिन्नर भागात झाले असून यात स्थानिक कलावंतांना वाव देण्यात आला आहे. या चित्रपटात संसारे यांनी खलनायकाची भूमिकासुद्धा केली असून चित्रपटाचे थीम सॉंग त्यांनीच लिहिले आहे.
यात एकूण पाच गाणी असून उमा परदेशी यांच्या गीतांना सारेगामा फेम अनिरूद्ध जोशी यांनी संगीतबद्ध केले आहे. तर मुख्य भूमिकेत सुर्यकांत देवकर हा देवळालीचा कलावंत तर नायिका रिद्धी घोडके आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम वेगाने सुरू असून येत्या तीन महिन्यात हा चित्रपट देशभर प्रदर्शित करण्याचा त्यांचा मानस आहे.
रंगीला, हम दिल दे चुके सनम व अलिकडचा अपने या चित्रपटांचे निर्माते हरी सुगंध व प्रोफेसर प्यारेलाल या चित्रपटाचे निर्माते बिहारी या अस्सल देवळालीकरांची परंपरा पुढे अव्याहतपणे सुरू ठेवणारे हनुमंता देवकर यांची निर्मिती असलेला ‘मेहरूनिसा’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे स्थानिक कलावंत उपेक्षित राहू नये, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व शहराचे नाव अधिक उज्वल व्हावे, या सद्हेतूने देवकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. केवळ महिनाभरात संपूर्ण लांबीचा चित्रपट तयार करताना येणार्‍या अनंत अडचणींवर यशस्वीपणे मात करत दिग्दर्शक, कलावंत व तंत्रज्ञांना संपूर्ण सहकार्य करणारे देवकर म्हणूनच कौतुकास पात्र ठरतात. दर्जेदार कथानक व मेहनत घेण्याची तयारी असणार्‍या कलाकारांना मदत करण्यास आपण सदैव तत्पर आहोत, ही त्यांची बोलकी प्रतिक्रिया स्थानिक कलावंतांना उभारी देणारी आहे.

LEAVE A REPLY

*