मोहटादेवी येथुन अपहरण झालेल्या भाविकाची सुटका!

0

जामखेडमधून अपहरणकर्ते पसार : पेढ्यातून गुंगीचे औषध 

टाकळीमानुर (वार्ताहर) – मोहटादेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकाला पेढ्याच्या प्रसादातून गुंगीचे औषध देऊन दोन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले. जामखेडजवळील माहिजळगाव येथील हॉटेलमध्ये नेऊन त्याच ठिकाणी भाविकाला सोडून अपहरणकर्ते पसार झाले. यातून मात्र अपहरणकर्त्यांचा उद्देश काय होता? यावर पोलिसांचा तपास सुरू होता. भाविकाच्या पोटाला चिकट द्रवपदार्थ लागल्याने किडनी काढण्याच्या उद्देशाने हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकाराने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पाथर्डी शहरातील आनंदनगर येथील रहिवासी असलेले दत्तात्रय गायकवाड मंगळवार (दि.3) रोजी सकाळी 10 वाजता पाथर्डी बसस्थानकावरून मोहटादेवीच्या बसमध्ये बसून दर्शनासाठी गेले होते. सकाळी दर्शन घेतल्यानंतर ते मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने गेले असता. 30 ते 35 वय वर्ष वयाच्या तीन तरुणांनी जवळ येऊन पिशवीतून एक पेढ्यांचा बॉक्स काढला व गायकवाड यांना दोन पेढे खाण्यासाठी दिले.
पेढे खाल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली. त्यांनतर त्यांना काहीच सुचले नाही. रात्री अडीच वाजता त्यांना जाग आली असता ते सोलापूर रोडला जामखेड जवळ एका हॉटेलवर असल्याचे लक्षात आले. त्यांनी हॉटेल मालकाला विचारले असता हॉटेल मालकाने त्यांना जेवण दिले व तुमच्या बरोबर तीन माणसे होती. ते बराच वेळ झाला गेले आहेत, असे सांगितले. गायकवाड यांनी पोटाला काही तरी थंड चिकट पदार्थ लागल्याचे लक्षात आले. किडनी सुरक्षीत आहे का? याची चाचपणी केली असता पोटाला व शरीराला कोठेही जखम दिसली नाही.
दरम्यान सकाळी 10 वाजता बाहेर गेलेले गायकवाड घरी का आले नाहीत म्हणून त्यांचा मुलगा प्रदीप गायकवाड यांनी सायंकाळपर्यंत वाट पाहिली. रात्रभर वडिलांचा शोध घेतला. अनेक नातेवाईकांना फोन केले मात्र त्यांचा कोठेच शोध लागेना.
अखेर दुसर्‍या दिवशी अपहरण झालेले गायकवाड घरी आले. त्यांना रडू कोसळले. घरच्या मंडळीनी चौकशी केली असता त्यांनी सर्व हकीकत आपल्या कुंटुबाला सांगितली. आपल्या वडिलांचे अपहरण झाले होते, असे मुलाच्या लक्षात आले. गायकवाड हे अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांनी पोलिसात फिर्याद दिली नाही.
त्यांना मानसिक धक्का बसल्याने ते पोलिसांकडे तक्रार अद्याप दाखल करू शकले नाहीत, असे त्यांनी पत्रकारांना सागितले.
मोहटा देवस्थानच्या चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. गायकवाड ज्या ठिकाणी बसले व त्यांचे अपहरण झाले होते, त्या ठिकाणी कॅमेर्‍यांची रेंज जात असावी, अशी चर्चा आहे. त्या तारखेचे रेकार्ड देवस्थानने काढले तर नक्की काहीतरी हाती लागेल, असा अंदाज आहे. देवस्थानने सुरक्षारक्षकांत अजून वाढ करावी, अशी मागणी काही भाविकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*