मातोश्रीने रोखली बारची वाट

1
आदेशामुळे ‘सर’सेनापतींचे अवसान गळाले ; महामार्ग मनपाकडे वर्गचा विषय गुंडाळला
वाटावाटीच्या चर्चेला पूर्णविराम

अहमदनगर (प्रतिनिधी)– सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नगर शहरातील महामार्गा महापालिकेकडे वर्ग करण्याचा विषय महासभेत घेण्यास रेड सिग्नल दाखविल्याची माहिती सूत्रांनी दिली. उध्दवसाहेबांच्या रेड झेंडीने शहरातील बारचे बंद झालेले द्वार खुले करण्यासाठी सरसावलेले सेनेचे ‘सर’सेनापतींना रिव्हर्स गियर टाकण्याची वेळ आली आहे. आता हा विषयच गुंडाळण्याची वेळ सत्ताधारी सेनेवर ओढावली आहे.

शहरातील सगळेच बार बंद झालेली नाहीत. 85 टक्के बंद तर 15 टक्के सुरू आहेत. 15 टक्के बारमध्ये लाईन लागत असल्याचे चित्र आहे. मातोश्रीचा कोणताच आदेश/फर्मान माझ्यापर्यंत पोहचलेले नाही. जाधव यांच्या पुढाकारातून हे सुरू आहे. 30 नगरसेवकांची पत्रे त्यांच्याकडेच असतील.
– प्रा. शशिकांत गाडे, दक्षिण जिल्हा प्रमुख.

सभापती मॅडम फॅमिलीचा पुढाकार
नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव यांना स्थायी समितीच्या सभापतीपदी विराजमान होऊन महिनाभराचा कालावधीही उलटला नाही तोच त्यांनीही या प्रकरणात ‘लक्ष’ घातले आहे. अर्थात त्या स्वत: ‘लक्ष’ घालत नसल्या तरी त्यांच्या कुटुंबियांचा यात हात आहे. शहरासह जिल्ह्यातील दारूबंदीसाठी अण्णा हजारे एकीकडे लढा देत असताना दुसरीकडे सभापती मॅडमच्याच कुटुंबियांतून त्याला प्रोत्साहन मिळत आहे. हा विरोधाभास चर्चेचा विषय ठरला आहे.

सर्वोच्च न्यायालच्या आदेशानंतर महामार्गालगतच्या बारचे शटर डाऊन झाले. शहरातील जवळपास 75 बार, हॉटेल्सला टाळे लागले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नगरमधील व्यक्तव्यानंतर शहरातून जाणारे पाच राज्यमार्ग व एक राष्ट्रीय महामार्ग महापालिकेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाले. हे महामार्ग महापालिकेकडे वर्ग झाल्यास बंद बारचे द्वार खुले होण्याचे मुंगेरीलाल के हसीन सपने शहरातील बारवाले पाहत होते. उध्दवसाहेबांच्या एका फर्मानामुळे त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. शहरातील बारवाल्यांची बैठक बोलावून त्यांच्यासोबत सेना पदाधिकार्‍यांची चर्चा झाली. हे सगळे करण्यामागे सेनेच्या ‘सर’सेनापतीचा हात होता. महापालिकेतील सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवकांनाही त्यामागचे गणित पटवून देण्यात ‘सर’ यशस्वी झाले. त्यासाठी 30 नगरसेवकांचे संमतीपत्रही महापौर कार्यालयात देण्यात आले. नगरसेवकांची मागणी असल्यामुळे महामार्गा वर्ग करण्याचा विषय थेट महासभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार होता. महापौर सुरेखा कदम हे स्वखुशीने हा विषय महासभेत मांडणार नसल्या तरी त्यांनी तो मांडावा यासाठी अनेक ‘वाटा’घाटीच्या बैठका झाल्या. मात्र शहरातील महिला व विरोधी पक्षाने हा विषय लावून धरला अडचण निर्माण होईल. त्यातच दारुबंदीचे समर्थक असलेले अण्णा हजारे याच जिल्ह्याचे. त्यांचीही भिती सेनेला होती. त्यावेळी अडचणीच्या काळात पक्षाची साथ हवी यासाठी महापौर सुरेखा कदम यांच्याकडून प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे हा विषय थेट पक्षप्रमुख उध्दवसाहेबांच्या कोर्टात गेला. मातोश्रीवरून तातडीने नगरचे महापौर व ‘सर’सेनापती तसेच नगरसेवकांना निरोप पाठवून हा विषय थांबविण्याचे फर्मान खास दूतरमार्फत मिळाले. त्यामुळे हा विषयच महासभेत जाणार नाही यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मातोश्रीच्या फर्मानामुळे ‘सर’सेनापतीचे अवसान गळाले आहे

1 COMMENT

LEAVE A REPLY

*