‘युनिसेफ’कडून बाल अत्याचारावर प्रकाश टाकणारे सर्वेक्षण

0
नाशिक । लहान मुलांवर होणार्‍या अत्याचाराचे स्वरूप कसे असते यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी युनिसेफ संघटनेच्या विद्यमाने नाईन इज माईन आणि मुंबई स्माईल यांनी राज्यव्यापी सर्वेक्षण केले आहे. त्यात कुटुंब, शाळा, कामाच्या ठिकाणी आणि समाजात मुलांवर होणारे अत्याचार वाढल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती चरखा या संस्थेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सर्वेक्षणात 13 ते 17 वयोगटातील सुमारे 5000 मुला-मुलींचे मत जाणून घेण्यात आले. यात मुले घरात होणार्‍या अत्याचारावर जास्त बोलत नाहीत. मनावर मात्र परिणाम होतो, असे आढळून आले आहे. तसेच काही मुलांनी घरातील भांडणे आपल्याला सहन होत नाहीत, असे नमूद केले आहे.

मुलींना शाळेत असुरक्षित वाटते कारण शाळेत प्रसाधनगृहे नाहीत. हिंसा असलेल्या घटनांची सार्वजनिक चर्चा होते. मात्र मुलांवर होणार्‍या अत्याचाराची फारशी चर्चा होत नसल्याचे सर्वेक्षणात आढळून आल्याचे चरखा संस्थेच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.

लहान मुलांवर कामाची जबरदस्ती तसेच त्यांना दलित, आदिवासी, धर्माच्या आधारे तुच्छतेची वागणूक देण्याचे परिणाम आढळून आले आहेत. यावर काय उपाय करता येतील याचे ठोकताळे सर्वेक्षणात नमूद करण्यात आल्याचे नाईन इज माईन या संस्थेच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले. मुलांना शाळा, घर या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच आरोग्यपूर्ण वातावरण तयार करण्यात यावे. मुलांच्या संवेदना जाणून घेण्याची वृत्ती प्रत्येकात जाणीवपूर्वक रुजली पाहिजे. लैंगिक अत्याचाराने पीडित मुलांचे पुनर्वसन, त्यांना धीर देण्याची उपाययोजना यंत्रणेने केली पाहिजे.

राज्यात मुलांसाठी 1098 ही चाईल्ड लाईन आहे. मुलांवर जर कोठे अत्याचार होत असेल तर या चाईल्ड लाईनचा उपयोग करून त्याची माहिती संबंधित विभागाला दिली पाहिजे. पोस्कोअंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये उपाययोजना असाव्यात. तसेच पालकांचेही मुलांच्या प्रती शिस्तबद्ध वर्तन असावे. मुलांना सौजन्याने वागवणे हे त्यांच्या विकसित होणार्‍या व्यक्तिमत्त्वासाठी योग्य असते.

मुलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे. मुलांचे संरक्षण व्हावे आणि त्यांना त्यांच्या भावविश्वात रममाण होता आले पाहिजे असे वातावरण घर, शाळा, समाज आणि आसपास असले पाहिजे, असे निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आले आहेत. त्याच्या शिफारशी यंत्रणेला दिल्याचेही यावेळी चरखा संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

LEAVE A REPLY

*