Thursday, May 2, 2024
Homeनगरउच्च न्यायालयाने आदेश देऊनही जबाब घेण्यास दिरंगाई

उच्च न्यायालयाने आदेश देऊनही जबाब घेण्यास दिरंगाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आर्मी स्टेशन हेडक्वार्टरच्या बनावट एनओसी प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जवाब नोंदवून घेण्यास तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे दिरंगाई करत आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. तसेच या गुन्ह्याचा तपास सीबीआय अथवा आयपीएस अधिकार्‍यांमार्फत करावा, अशी मागणी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

स्टेशन हेडक्वॉर्टरच्या बनावट एनओसी प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केलेली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्याकडून काढून उपअधीक्षक कातकाडे यांच्याकडे वर्ग केला आहे.

कातकाडे यांच्याकडे पत्र देऊन काही बाबी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या अनुषंगाने कोणताही तपास करण्यात आलेला नाही. त्यानंतर तपासी अधिकारी अनिल कातकाडे यांना पत्र देऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माझा जबाब नोंदवून माझ्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे ताब्यात घेण्यात यावीत, अशी विनंती केली होती. मात्र, त्यांनी जवाब नोंदवून घेतलेला नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने तपास अधिकार्‍यांना जबाब नोंदविण्याचे व कागदपत्रे रेकॉर्डवर घेण्याचे आदेश दिलेले आहेत. तरीही त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अनुपालन केलेले नाही.

गुन्ह्याचा सखोल तपास होऊन मूळ आरोपी विरोधात कारवाई होण्यासाठी तपास सीबीआय किंवा आयपीएस अधिकार्‍याकडे वर्ग करावा, असे शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या