आमदार पाचपुते यांच्या निवडीला आव्हान

आमदार पाचपुते यांच्या निवडीला आव्हान

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीत अत्यंत अतितटीच्या लढतीत विजयी ठरलेले भाजप उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. पराभूत उमेदवार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी ही याचिका (क्र.26/2019) दाखल केली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपविणे, खोटी माहिती देणे, संपत्ती लपविणे आणि निवडणूक खर्च वेळेत न सादर करणे ही कारणे याचिका सादर करताना दिलेली आहेत. विधानसभा निवडणुकीत शेलार यांनी दिलेली लढत चर्चेचा विषय ठरली होती.

अवघ्या साडेचार हजार मतांच्या फरकाने पाचपुते विजयी झाले आहेत. मात्र या निवडीला आक्षेप घेत याचिका दाखल झाल्याने पुन्हा एकदा श्रीगोंदे मतदारसंघातील निवडणूक चर्चेची ठरत आहे. शेलार यांनी याचिकेबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले.

या निवडणुकीत मतमोजणी वेळी मतांच्या बेरजेत तफावत आसल्याने रात्री उशीरापर्यंत हा निकाल राखीव ठेवला होता. मात्र नंतर पाचपुते यांना विजयी घोषित केले होते. याच वेळी शेलार यांनी हरकत नोंदवली होती, मात्र निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी हरकत फेटाळून लावली होती.

उमेदवारी अर्ज भरताना गुन्ह्यांची माहिती लपविणे, खोटी माहिती सादर करणे, संपत्तीची माहिती लपविणे, निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न करणे आदी कारणे याचिकेत दिले आहेत.

आ. रोहित पवारांबाबतही चर्चा
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या निवडीला अपक्ष उमेदवार ज्ञानदेव नरहरी सुपेकर यांनी आव्हान दिल्याची चर्चा होती. मात्र या संदर्भात सुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता तेच या कथित याचिकेबाबत अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले, असे आमचा कुळधरण येथील वार्ताहर कळवितो. या प्रकारची कोणतीही याचिका आपण खंडपीठात दाखल केली नसल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात मला अनेकांकडून विचारणा होत असून, मीच आता हा काय प्रकार आहे, याचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com