नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट; जिल्हयात 448 मिलीमीटर पाउस; धरणातून विसर्ग सुरू

0
नाशिक । गुरूवारी मध्यरात्रीपासून कोसळणारया मुसळधार पावसाने जिल्हयातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. धरण क्षेत्रात सकाळच्या सुमारास जोरदार पाउस होत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दारणा , नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला.

दुपारनंतर धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला असला तरी रात्रीतून पावसाचा जोर वाढल्यास हा प्रवाह वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हयात 448.6 मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.

जुलै महीन्याच्या पूर्वार्धात जिल्हयात पावसाचे पुनरागमन झाले. गेल्या दोन दिवसांपासून दुबार पेरणीचे संकट उभे ठाकलेल्या शेतकरयांच्या चेहरयावर यापावसाने पुन्हा एकदा समाधानाचे हास्य फुलवले आहे. उत्तर प्रदेशावर असलेला कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेशकडे सरकला आहे. त्याचवेळी पश्चिम राजस्थान ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गुजरातसह महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.

राज्यात पावसाला अनूकुल स्थिती निर्माण झाल्याने पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे़ जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने दडी मारली होती. मान्सून सक्रिय होत असतानाच गुरुवारी सकाळपासूनच शहरासह उपनगरांत पावसाने दमदार हजेरी लावली; शिवाय सोसाट्याच्या वार्‍यानेही यात भर घातली. धरणांचा तालुका असलेल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सकाळी अधूनमधून या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

धरणातून पाण्याचा विसर्ग : मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे दारणा , नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. आज दुपारी 1 वाजेपर्यंत दारणा धरणातून 5100 क्युसेक पाणी सोडण्यात आले. या परिसरात पावसाचा जोर वाढल्याने दुपारी 4 वाजेनंतर हा प्रवाह 12 हजार 751 क्युसेक करण्यात आला. त्याचप्रमाणे नांदूरमध्यमेश्वर धरणातून दुपारी 50 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

दुपारी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने हा विसर्ग दुपारी 3 वाजेनंतर 22 हजार 384 क्युसेक करण्यात आला. गंगापूर धरणातून मात्र पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही. मात्र गंगापूर धरणक्षेत्रात पडणारया पावसामुळे पाण्याची पातळी वाढत असून उद्या दि. 15 रोजी गंगापूरमधून पाणी सोडावे लागण्याची शक्यता पाटबंधारे खात्याने वर्तविली आहे.

पुलाला भगदाड  : घोटी सिन्नर महामार्गावरील घोटीपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने या महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक थांबविण्यात आली होती. दुपारी प्रांत राहूल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना तातडीने काम करण्याबाबत निर्देशित केले. दरम्यान घोटीतून जाणारी वाहतूक अन्य मार्गाने तर सिन्नरकडून येणारी वाहतूक साकुर फाटा मार्गाने वळवण्यात आली आहे. बुडळी तालुका सुरगाणा येथे जोरदार पावसामुळे पाझर तलाव फुटल्याने परिसरातील शेतीत पाणी शिरल्याने नुकसान झाले. सायखेडा येथील पुलाला पानवेलींचा विळखा पडल्याने पाण्याचा प्रवाह अडला होता येथील स्थानिक प्रशासनाने तातडीने या पानवेली हटविण्याचे काम सुरू केले.

गोदावरीची पातळी वाढली : गंगापूर धरण आणि आळंदी धरणाच्या खालील भागामध्ये (फ्री कॅचमेट एरिया) पावसाचे प्रमाण वाढत असल्याने आणि तेथून प्रवाहीत होणार्‍या पाण्याचा प्रवाह हा गोदावरी नदीस येऊन मिळत असल्याने आज दिवसभरात सुमारे 20 हजार क्युसेक इतके पाणी गोदावरीत येउन मिळाल्याने गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढ झाल्याने गोदावरीला पुर आला. आज दिवसभरात दारणा धरणात 24 हजार 154 क्युसेक पाणीसाठा वाढल्याने 12 हजार 751 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला. तर गंगापूर धरणात 6500 क्युसेक पाणीसाठा वाढला आहे.

हवामान खात्याचा इशारा : 15 जुलै रोजी उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 16 व 17 जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता़.हवामान खात्याने वर्तविली आहे.

आपत्कालीन कक्षास संपर्क करा : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास सुरु ठेवण्यात आला आहे. आपत्कालीन कक्ष संपर्कासाठी टोल फ्रीं क्रं. 1077 क्र. 0253-2315080क ्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*