Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना मदतीचा हात

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी 

गेल्या चार-पाच दिवसांपासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. तसेच अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवाशी अडकले होते. रेल्वे गाड्या रद्द असल्याने प्रवाशांना प्रवास करणे अवघड झाल्याने हे प्रवाशी दोन-तीन दिवसांपासून रेल्वे स्थानकावर थांबून होते. या प्रवाशांना मदतीचा हात म्हणून नाशिकरोड शिवजन्मोत्सव सोहळा समिती व मासिक पासधारकांच्या वतीने काल सकाळी अल्पोपहाराची सोय करण्यात आली.

पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने येथील रेल्वे स्थानकावर दोन दिवसांपासून दीड ते दोन हजार प्रवासी खोळंबले होते. यात बहुतांशी प्रवासी परराज्यातील असल्याने त्यांना स्थानिक ठिकाणचा सहारा नव्हता. या प्रवाशांनी आपला मुक्काम स्थानकावरच केला. दोन दिवसांपासून त्यांना अन्नपाणी मिळणे मुश्किल झाले होते.

या प्रवाशांची दखल येथील शिवजन्मोत्सव सोहळा समिती व रेल्वेच्या मासिक पासधारकांनी घेतली. काल सकाळी सर्व प्रवाशांना अल्पोपहार वाटप करण्यात आला. त्याचा फायदा सर्वच प्रवाशांनी घेतल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. अल्पोपहार घेण्यासाठी मोठी झुंबड उडाल्याने पोलीस बंदोबस्तात त्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी समितीचे अध्यक्ष राजेश फोकणे, युवा नेते शिरीष लवटे, शिवसेना उपमहानगरप्रमुख नितिन चिडे, नितिन खर्जुल, सुनील सोनवणे, मिलिंद माळवे, नितिन पाटील, दत्ता गोसावी, राजेंद्र पाटील, किरण बोरसे, गोपाळ नाईक, राजू बैरागी आदींसह पासधारक उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!