Gallery : मुसळधार पावसाने शहराला झोडपले

अर्धा तासात पाणीच-पाणी

0
नाशिक | दि. १४ प्रतिनिधी- दिवसभर असलेला प्रचंड उकाडा… उन्हाच्या कडाक्याने त्रस्त नागरिक… अन् सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान सुमारे अर्धातास झालेल्या पावसाने शहरात पाणीच-पाणी झाले. पावसाने आज शहराला मुसळधारेने झोडपून काढले. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.

जोरदार हवेच्या बरोबरीने सायंकाळी शहरात पाच वाजता पावसाचे आगमन झाले होते. सुरुवातीला पावसाचा वेग कमी होता. मात्र नंतर हवा आणि पाऊस सोबत असल्याने अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे रस्त्यांवर वाहनचालक, पादचारी नागरिक आणि बाजारपेठेतील गर्दीची धावपळ झाली. पावसाचा वेग एवढा प्रचंड होता की, समोर काही अंतरावरचे दिसत नव्हते. त्याचबरोबर रस्तांवरून सुमारे एकदीड फूट पाणी वाहू लागल्याने रस्त्यावर विक्री करणारे, फिरते विक्रेते आणि व्यावसायिकांची धावपळ उडाली.

शहराचा मध्यवर्ती भाग जुने नाशिक, रविवार कारंजा, भद्रकाली, मेनरोड, खडकाळी, पंचशील नगर, जुना त्र्यंबक नाका, शिवाजीरोड, सीबीएस, शरणपूररोड, गंगापूर रोड, कॉलेजरोड, महात्मानगरसह सातपूर, सिडको, अंबड, औद्योगिक वसाहत, इंदिरानंगर,सिडको, गांधीनगर, उपनगर, नाशिकरोड परिसरात एकाचवेळी जोरदार पाऊस सुरू होता. उच्च-सखल भागात असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले होते. तर बर्‍याच मार्गावर जागोजागी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली होती.

झोपडपट्टी भागात पाणी शिरल्याने शहरातील भारतनगर, भिमवाडी, पंचशीलनगर, फुलेनगर, वाघाडी, बजरंगवाडी परिसरातील घरात पाणी शिरले होते. तसेच या भागातील अर्ंतगत गटारी तुंबल्याने पाणी चेंबरमधून बाहेर वाहत होते. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास नागरिकांना झाला.

सराफ बाजारात दुकानात पाणी
रस्त्यांची उंची वाढल्याने पावसात दुकानात पाणी शिरण्याचे चित्र पहिल्याच जोरदार पावसाने आरंभी दाखवले आहे. सराफबाजार, भांडीबाजार, बोहरपटी, चांदवडकर लेन, हुंडीवाला लेन, सोमवार पेठ येथील दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली. अनेक दुकानांमध्ये साहित्य पाण्यात भिजल्याने त्याचे नुकसान झाले. पार्कींगमध्ये वाहने पाण्यात बुडाली होती. तसेच वेगाने येणार्‍या पाण्याने तिळभांडेश्‍वर लेन, गेणुपागा लेन, बालाजीमंदिर परिसरात गुडघाभर पाणी रस्त्यांवर होते.

वृक्ष कोसळून एक जखमी
हवेत वेग अधिक असल्याने काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्या तर न्यायालय परिसरात जुना वृक्ष कोलमडून पडल्याने एका युवकाला त्यामुळे दुखापत झाल्याची घटना न्यायालय परिसरात घडली.

वीजपुरवठा खंडित
पावसाने जीवित अथवा वित्तहानी टाळण्यासाठी महावितरणकडून काहीठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, काही भागात तारांवर वृक्षांच्या फांद्या कोसळल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झालेला होता. पावसाच्या उडीपनंतर दुरुस्ती काम सुरू होते.

LEAVE A REPLY

*