Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकगाव करील ते राव काय करील..!

गाव करील ते राव काय करील..!

उगाव | Ugav

गाव करील ते राव काय करील’ ही म्हण प्रत्यक्षात अंमलात आणत निफाड तालुक्यातील उगाव येथील युवकांनी एकत्र येत आठ दिवसांत कोविड सेंटर उभे केले आहे.

- Advertisement -

निफाड तालुक्यातील उगाव येथील युवकांनी एकत्र येत गावातील नागरिक, व्यावसायिक तसेच बाहेरगावी गेलेल्या युवकांना आर्थिक व वस्तूंचे मदतीसाठी आवाहन केले.

या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल पाच लाख वीस हजार रुपयांचा निधी जमा केला. तसेच काहींनी पलंग, गाद्या, उशा, ऑक्सिजन सिलेंडर व सँनिटायझर आदींची बहुमोल मदत केली. यातून आठ दिवसात छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटरची उभारणी केली.

निफाड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून परिसरातील खेड्यापाड्यावर देखील याचा परिणाम दिसत आहे. या काळात उगावचे तलाठी राजेंद्र गायकवाड, ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ गायकवाड, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कलिम पठाण, आरोग्य सेवक चौधरी, आरोग्य सेविका व आशा कार्यकत्या यांची करोना काळात मोठी धावपळ होत होती.

नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने उगाव येथे कोविड केअर सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव निफाड तहसील कार्यालय व पंचायत समिती निफाड यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष ना.बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उगाव गटाचेच आरोग्य धोक्यात आल्याने उगाव येथे तातडीने कोविड केअर सेंटर स्थानिक नागरिकांच्या लोकसहभागातून सुरू करण्याचे आदेश जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी दिले.

यासाठी उगावचे तलाठी गायकवाड यांनी स्वतःचे एकवीस हजार रुपये देऊन पं.स..सदस्य सोमनाथ पानगव्हाणे, ओम गायत्री उद्योग समुहाचे मधुकर गवळी, लासलगाव कृउबा समिती सदस्य भास्करराव पानगव्हाणे, प्रभाकर मापारी, ज्ञानेश्वर पानगव्हाणे, नंदकुमार पानगव्हाणे, साहेबराव ढोमसे, अब्दुल शेख,राजेंद्र शेटे, जयवंत ढोमसे, राजू साबळे यांना व गावातील तरूणांना मदतीला घेऊन आर्थिक मदत जमा केली.

उगावचे पृथ्वीराज मधुकर ढोमसे यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची बहुमोल मदत केली. समाज माध्यमातून आवाहन केल्यामुळे पाच सहा दिवसातच पाच लाख वीस हजार रुपये जमा झाले. आणि छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटर उभे राहिले.

उगाव येथील ९० वर्षाच्या श्रीमती कौशल्याबाई मधुकर ढोमसे यांच्या हस्ते व आमदार दिलीप बनकर यांच्या व गावकऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी पाच रूग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दहा रूग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र पाठविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या