Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुुमारे 475 कोटींचा पीकहानी

Share

16 हजार 226 हेक्टरवरील फळबागा भूईसपाट

अहमदनगर (प्रतिनिधी) –सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती आणि उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक आकडेवारीत जिल्ह्यात 3 लाख 65 हजार शेती आणि उभी पिके उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात नुकत्याच पूर्ण झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यात हा आकडा 4 लाख 54 हजार हेक्टरच्या पुढे गेला आहे. शासकीय यंत्रणेने केलेल्या पंचनाम्याचा आकडा 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचा असून झालेल्या नुकसानीचे मुल्य 475 कोटी 10 लाख 50 हजार रुपयांचे असल्याचा अहवाल राज्य सरकारच्या कृषी विभागाने तयार केला आहे.

कृषी विभागाने झालेल्या पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या संयुक्त सहिने राज्याचे कृषी आयुक्त यांना सादर करण्यात आला असून कृषी आयुक्त हा अहवाल सरकारला सादर करणार आहेत. या अहवालाची प्रत विभागीय आयुक्तांना देखील सादर करण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 5 लाख 91 हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती.

शेवटच्या टप्प्यात पावसाने चांगलाच जोर धरला. सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यातील पावसाने सरासरीची मर्यादाच ओलांडली. हा काळ नेमका खरीप हंगामातील पिकांच्या काढणीचा होता. यावेळीच अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 1 हजार 529 गावांतील 3 लाख 84 हजार शेतकरी यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याचा अंदाज कृषी विभागाचा होता.
त्यानंतर 1 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या पंचानाम्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यात 4 लाख 54 हजार 12 हेक्टरवर नुकसान झाल्याची आकडेवारी संकलित झाली. जिल्ह्यात 1 हजार 583 गावात 6 लाख 36 हजार 146 शेतकर्‍यांचे 4 लाख 54 हजार हेक्टरवर नुकसान झालेले आहे.

शासकीय यंत्रणेने संकलित केली आकडेवारी ही सरसकट नसून 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांची आहे. यात 2 लाख 16 हजार हेक्टरवरील जिरायत भागातील, 2 लाख 21 हजार हेक्टरवरील बागायत भागातील पिके आणि 16 हजार 226 हेक्टरवरील फळबागांचा समावेश आहे.
जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील 170 सर्वाधिक गावांमध्ये, तर श्रीरामपूरमधील 56 सर्वात कमी गावात शेतीचे नुकसान झालेले आहे. सर्वाधिक बाधीत शेतकर्‍यांची संख्या पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक 83 हजार 335 असून सर्वात कमी शेतकरी संख्या 11 हजार 124 जामखेड तालुक्यात आहे.

पंचनाम्याची अंतरिम आकडेवारी
नगर 34922 शेतकरी (21 हजार 731), पाथर्डी 83335 (61 हजार 781), पारनेर 40124 (22 हजार 216), कर्जत 36140 (26 हजार 753), श्रीगोंदा 47370 (31 हजार 648), जामखेड 11124 (5 हजार 215), श्रीरामपूर 31806 (29 हजार 472), नेवासा 56103 (45 हजार 222), शेवगाव 73778 (59 हजार 705), राहुरी 42394 (30 हजार 982), संगमनेर 60396 (34 हजार 198), अकोले 59055 (28 हजार 399), कोपरगाव 40022 (32 हजार 326), राहाता 18777 (21 हजार 358) असे आहेत.

पंचनाम्याची संकलित करण्यात आलेल्या आकडेवारीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर सरकार नुकसान भरपाईचा निकष तयार करून त्यानुसार भरपाई करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यासह संकलित पंचनाम्याच्या आकडेवारीतून पिक विमा असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या आणि बाधीत क्षेत्राची आकडेवारी कमी होणार आहे. यामुळे आता संकलित झालेल्या आकडेवारीतून किमान 30 ते 40 टक्के आकडे कमी होण्याची शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!