Friday, April 26, 2024
Homeनगरअतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे सुमारे आठ कोटींचे अनुदान जमा – आ. कानडे

अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे सुमारे आठ कोटींचे अनुदान जमा – आ. कानडे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात श्रीरामपूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सुमारे 31 हजार शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पहिल्या टप्प्यात जवळपास 11 हजार शेतकर्‍यांना पिकांसाठी हेक्टरी आठ हजार रुपये आणि फळबागासाठी हेक्टरी आठरा हजार रुपयांप्रमाणे असे एकूण सुमारे सात कोटी 94 लाख रुपयांचे अनुदान जमा झाल्याची माहिती श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे आणि जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी दिली.
परतीच्या पावसाबरोबरच अतिवृष्टीमुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

त्यामध्ये प्रामुख्याने शेतकर्‍यांच्या हाताशी आलेल्या सोयाबीन, बाजरी, कपाशी या पिकांबरोबरच फळबागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला. झालेल्या नुकसानीचे शासनस्तरावर पंचनामे करण्यात आले होते. तालुक्यात सुमारे 33 हजार शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे झाले होते. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास 11 हजार शेतकर्‍यांचे सुमारे 7 कोटी 94 लाख रुपयांचे अनुदान खात्यावर वर्ग झाले आहे.

- Advertisement -

झालेले नुकसान आणि भेटलेली भरपाई यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे, शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंज्या स्वरुपाची आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांसाठी हेक्टरी 25 ते त30 हजार रुपये इतके अनुदान देण्याची मागणी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांकडे करणार आल्याचे आमदार लहू कानडे आणि ससाणे यांनी म्हटले आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील देखील बोधेगावं, चांदेगाव, ब्राम्हणगाव भांड, जातप, त्रिंबकपूर, आंबी आणि मुसळवाडी या गावांतील देखील नुकसान भरपाईचे अनुदान जमा झाले आहे, नुकसान भरपाईचा पुढचा टप्पा देखील लवकरच मिळणार असून त्याबात जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठपुरावा चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर आमदार कानडे यांची समयसूचकता
शासन धोरणानुसार एका दिवसात विशिष्ट मिलिमीटर पाऊस पडला, तरच अतिवृष्टी जाहीर करण्यात येत होती. परंतु प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेले आमदार कानडे यांनी थेट मुख्य सचिव अजय मेहता यांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघातील अवकाळी पावसाची वस्तुस्थिती सांगितली आणि शासनाने नव्याने शासन निर्णय काढत अतिवृष्टी बाबतचे निकष बदलले आहेत. त्याच बरोबर नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्यासाठी देखील योग्य पाठपुरावा केला होता. त्यामुळे येणार्‍या काळात आ. लहू कानडे यांच्या अनुभवाचा मोठा फायदा मतदारसंघाला होणार असल्याचे करण ससाणे यांनी म्हंटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या