नाशिकमध्ये धरण विसर्गात वाढ; पावसाची रिपरिप सुरूच; जिल्ह्यात 112 मिमी पाऊस

0
नाशिक । जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून त्यामुळे नद्यांमधील पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पुन्हा अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. सायंकाळीही पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात चार दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. दररोज दुपारच्या सुमारास हजेरी लावणार्‍या पावसाने मंगळवारी मात्र सकाळपासूनच संततधार कायम ठेवली. आज दिवसभर शहरात ऊन-पावसाचा लपंडाव सुरू होता. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

दिंडोरी, इगतपुरी, निफाड, बागलाण, देवळा, येवला, मालेगाव, पेठ, चांदवड या तालुक्यांमध्ये हजेरी लावली. मंगळावारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपयर्ंंत जिल्ह्यात 112 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

या पावसामुळे धरणांमधील पाणी पातळीत वाढ झाली असून गंगापूर आणि दारणासह आळंदी, वालदेवी धरणांतून सायंकाळी उशिरापर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू होता. रात्री 8 वाजेनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. गंगापूरमधून सकाळी 1212 क्यूसेकचा विसर्ग सुरू होता.

सायंकाळी यात वाढ करण्यात येऊन सुमारे 2832 क्यूसेक करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीमधील पाणी पातळीत वाढ होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. गोदाकाठावर असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पातळी पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

*