Video : पावसाचे दमदार पुनरागमन; गोदेला पुन्हा पुर; दिवसभरात 285 मि.मी पावसाची नोंद

0

पंंधरवड्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचे पुनरागमन झाले. आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात 285 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर, दारणा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरीला पुन्हा पूर आला. त्यामुळे गोदाकाठावरील लहान मंदिरे पाण्याखाली गेली. त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक 91 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.

गेल्या 24 तासांत त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व निफाड तालुक्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. सिन्नर, दिंडोरी, चांदवड व येवला तालुक्यांत रिमझिम पाऊस पडत आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे गंगापूर धरणसमुहातील गौतमी, काश्यपी, आळंदी या धरणांसह मुख्य गंगापूर धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे.

सकाळी अकरा वाजेपासून विसर्गास सुरूवात झाली. प्रारंभी एक हजार क्युसेक, दोन तासांनी दोन हजार क्युसेक तर दुपारी दोन वाजता 4680 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सायंकाळी 6 वाजेनंतर गंगापूरतून 6402 क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता.

होळकर पुलाखालून 6297 क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यामुळे नदीकाठालगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्याने सोमेश्वर मंदिराजवळील दूधसागर धबधबा खळाळला आहे. रविवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात 252.8 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. नाशिक शहरात 15 मि.मी, इगतपुरी 65 तर त्र्यंबकेश्वर येथे 62 मि.मी पावसाची नोंद झाली.

धरणांत 76 टक्के पाणी : जिल्हयातील 7 मोठया आणि 17 मध्यम अशा एकूण 24 प्रकल्पांत 76 टक्के पाणीसाठा झाला आहे. गंगापूर धरणसमुहात 93 टक्के तर समुहातील गंगापूर धरणात 88, काश्यपी 98, गौतमी गोदावरी 96, आळंदी धरण 100 टक्के भरले आहे. पालखेड धरण समुहात 92 टक्के तर दारणा समुहात 83 टक्के पाणीसाठा आहे. दारणा धरण 94 टक्के तर नांदूरमध्यमेश्वर धरण 96 टक्के भरले आहे. गिरणा खोर्‍यातही 61 टक्के पाणीसाठा आहे. आळंदी , वाघाड , वालदेवी , हरणबारी, केळझर , मुकणे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

पुढील दोन दिवस मुसळधार : हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य भारतात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. यामुळे मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

85 टक्के पाऊस : जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आतापर्यंत 85 टक्के पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात 1 जूनपासून 13 हजार 20 मी.मी. पावसाची नोंद झाली. ऑगस्टच्या सरासरीच्या 27.8 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे.

 

LEAVE A REPLY

*