Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार; जनजीवन विस्कळीत; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Share

नाशिक | प्रतिनिधी 

ऐन दिवाळीत पावसाने हजेरी लावल्याने दिवाळीच्या सणावर पावसामुळे विरजण पडले आहे. तर जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून अति पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. बागलाण तालुक्यात झालेल्या पावसामुळे अर्ली द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असून खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी नुकसानिची पाहणी करून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.

तर आज निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे पिक वाया गेले आहे. आज सायंकाळी नाशिक शहरासह दिंडोरी, निफाड आणि सिन्नर तालुक्याच्या काही भागास पावसाने चांगलेच झोडपले. दिंडोरीत गारांचा पाऊस झाल्याने ऐन छाटणी झालेल्या द्राक्षबागायित दारांनी धास्ती खाल्ली आहे.

निफाड तालुक्यात म्हाळसाकोरे व परिसर पंधरा मिनिटात जलमय झाला.  विजांचा गडगडाट वाऱ्यासह तुफान पाऊस  झाल्याने याठिकाणी विजेची बत्ती गेल्या दोन तासांपासून गुल झाली आहे.

मौजे सुकेणे व कसबे सुकेणे येथे परतीच्या पावसाला जोरदार सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता पावसाला सुरुवात झालेली असताना जवळपास एक तासभर पावसाने परिसराला अक्षरशः झोडपून काढले. छाटलेल्या द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रभर बागांवर पाणी असल्याकारणाने फवारणी करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

कोठुरेत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर तालुक्यातील पूर्व भागात शिरवाडे वाकदला जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. करंंजी खुर्द व परिसरात जोरदार पाऊस बरसला. तिकडे भाऊसाहेब नगरला मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची धावपळ बघायला मिळाली. तर अचानक पिंपळस रामाचे येथे जोरदार पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान झाले.


नाशिक शहरात दिवाळीच्या खरेदीवर विरजण 

दिवाळी पाड्व्याच्या निमित्ताने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रविवार कारंजा, सीबीएस परिसर, शालीमार, मेन रोडवर खरेदीसाठी आलेल्या  नागरिकांची सायंकाळी आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. दिवाळीच्या निमित्ताने अनेक किरकोळ व्यावसायिक याठिकाणी आलेले आहेत, अचानक आलेल्या पावसामुळे त्यांचीही मोठ्या प्रमाणत धावपळ बघायला मिळाली. मुंबई आग्रा रस्त्यावर प्रवाशांचे मोठे हाल झालेले बघयला मिळाले.


नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी केली नुकसानीची पाहणी

देवळालीच्या नवनिर्वाचित आमदार सरोज अहिरे यांनी गिरणारे दुगाव परिसरातील टमाटा द्राक्षे पिकांचे नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!