परतीच्या पावसाने देवळा तालुक्याला झोडपले; शेतीपिकांचे नुकसान; वीज कोसळून बैल ठार

0
भऊर (बाबा पवार) | देवळा तालुक्यातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात निर्माण झालेल्या उकाड्याने हैराण झाले होते. मात्र काल आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांना दिलासा दिला असला तरी परतीच्या पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

विजांचा कडकडाटासह वाढली वाऱ्यासह आलेल्या पावसात वीज कोसळून एक बैलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तालुक्यातील पिंपळगाव शिवारातील राण्यादेव हुडी येथे सुकदेव संतोष वाघ यांच्या शेतात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वीज पडून घराशेजारी बांधलेल्या बैलाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत वाघ यांचे ७७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसऱ्या एका घटनेत पिंपळगाव येथील नवेगाव शिवारात विश्वनाथ देवचंद परदेशी यांच्या घरलगत बांधलेल्या शौचालयावर वीज पडून शौचालय पडले,  तर घरातील फ्रीज व इन्व्हर्टर जाळून हजारो रुपयांचे नुकसान झाले.

मात्र सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खारगे, तलाठी डी. व्ही. कदम. पोलीस पाटील योगेश वाघ, उपसरपंच नदीश थोरात यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

सध्या कापणीचा हंगाम आहे. शेतात कापणी करून ठेवलेल्या बाजरी, मकासह इतर खरीप पिकांचे व चाऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

उन्हाळ कांद्यासाठी टाकलेल्या रोपाचे व काढणीस आलेल्या पावसाळी कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पळवला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*