येत्या 48 तासांत जोरदार पावसाचा इशारा; दिवसभरात 34 मिमी पावसाची नोंद; सिन्नरला झोडपले

0
नाशिक । सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विश्रांती घेणार्‍या पावसाने शुक्रवारी पुनरागमन केले असून येत्या 48 तासांत उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात 34 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सिन्नरला सर्वाधिक 19 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

पावसाच्या विश्रांतीमुळे तापमान वाढले होते. मात्र शुक्रवारी दुपारी वातावरण बदलत गेले आणि दुपारी 2 च्या सुमारास ढग दाटून आल्याने काळोख झाला. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. काही क्षणात पावसाने नागरिकांना चिंब केले.

बेसावध नागरिकांना पावसापासून बचावासाठी आडोसा शोधावा लागला. अवघ्या काही मिनिटांत पावसाने शहराच्या बहुतांश भागातील रस्ते धुवून काढले. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत 0.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

5 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. जिल्ह्यात दिवसभरात 34 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सिन्नरमध्ये सर्वाधिक 19 मिलीमीटर पाऊस झाला. येवल्यात 13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातही तुरळक पाऊस पडला असून तेथे प्रत्येकी एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

*