नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; गणेशोत्सवावर पाऊसाचे सावट

0
नाशिक । जिल्ह्यात गणरायाचे आगमन झाल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात पाऊसाचा जोर वाढला आहे. सलग तिसर्‍या दिवशी जिल्ह्यातील बहुतांशी भागात आणि नाशिक शहर परिसरात पाऊस सुरू असल्याने गणेशोत्सवावर पाऊसाचे सावट पडले आहे.

आज जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासुन कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असुन यामुळेच गंगापूर, दारणा धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्रात येत्या 72 तासात अतिवृष्टीचा इशारा मुंबई वेधशाळेने दिला असुन यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर सावट पडले आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात गेल्या तीन चार दिवसापासुन कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे. यात श्री स्थापनेच्या दिवशी तर वरुण राजाने लाडक्या गणरायाचे स्वागत केले होते. विशेषत: जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, नाशिक, पेठ – सुरगाणा भागात पुन्हा एकदा पाऊसाने जोर धरला आहे.

मध्यतरी काहीअंशी उघडपीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला असुन यामुळेच पश्चिम पट्ट्यात धरणाच्या पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. यामुळेच जलसंपदा विभागाकडुन शनिवारपासुन गंगापूर व दारणा धरणातून पुन्हा एकदा विसर्ग सुरू केला आहे. याचबरोबर जिल्ह्यातील पुर्वेकडील भागात रिमझिम स्वरुपाचा पाऊस सुरू झाला आहे. गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यापासुन पाऊस सुरू झाला असुन सलग तिसर्‍या दिवशी बहुतांशी तालुक्यात वरुण वर्षावाने गणेश भक्ताच्या मंडळाच्या सजावटींच्या कामांना ब्रेक लागला आहे.

नाशिक शहर परिसरात आज सकाळपासुन पाऊस सुरू होता. दिवसभरात काही वेळ थांबत सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसुन आले. या पाऊसामुळे शहरातील बाजारपेठेवर परिणाम झाला. अशाप्रकारे दिवसभरात ननाशिकला 18.4 मि. मी. इतक्या पाऊसांची नोंद झाली. मुंबई वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यामुळे मात्र गणेशोत्सवावर पाऊसाचे सावट पडले आहे.

LEAVE A REPLY

*