Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : महापुरानंतरचे ‘अश्रू’ : सायखेड्यातील गंंगानगर गेले वाहून…

Share

नाशिक । कुंदन राजपुत / दिनेश सोनवणे

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले…’

गोदामाईच्या काठी वसलेल्या चांदोरी व सायखेडा गावातील महापुराने बाधित रहिवाशांची अवस्था पाहिल्यावर कवीवर्य कुसुमाग्रज यांची ही कविता आठवते. महापुराचे पाणी गावात शिरल्याने येथील शेकडो गोरगरिबांचे संसार वाहून गेले. भिंत खचली, चूल विझली अशी अवस्था असून महापुराने त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले.

मात्र, तरीदेखील परिस्थितीसमोर हार न मानता जिद्दीने संसाराचा डाव मांडण्याचा त्यांचा संघर्ष सुरू आहे. मोडून पडलेल्या संंसाराला संघर्षाची किनार आहे. मायबाप सरकारने निदान मदतीचा आधार द्यावा, अशी भाबडी अपेक्षा पूरग्रस्त बाधितांनी व्यक्त केली आहे.

सायखेड्याच्या वेशीत प्रवेश केल्यावर रस्त्याच्या डाव्या हाताला गंगानगर वस्ती. वस्तीच्या दुसर्‍या बाजूला गोदामाई. त्यामुळे सायखेड्यात पुराचा पहिला तडाखा हा गंगानगरला बसला. संसार उपयोगी सामान दूर वाहून गेले होते. महापुराने घरेच्या घरे गिळंकृत केली. पूर ओसरला तरी अनेकांना शाळा, मंगल कार्यालये या ठिकाणी आसरा घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मात्र, दुसर्‍याच्या घरात किती दिवस पाहुणे हा प्रश्न बाधितांना सतावत आहे.

शंकर गायकवाड (वय-80) हे मागील दोन पिढ्यांपासून गंगानगरमध्ये राहात होते. मात्र, पुराच्या तडाख्यात त्याचे हे घर वाहून गेले. या ठिकाणी घराचा ढिगारा, एक कपाट पडलेले आहे. अंगावरचे कपडे सोडले तर आता त्यांंच्याकडे गमवण्यासारखे काहीच नाही. गायकवाड हे एकटे नव्हे. त्याच्या आजूबाजूला राहणारे अनेकांची घरे पुरात वाहून गेली.

निवडणुकीत या ठिकाणी हजेरी लावणारे पुढारी या संकटात येथे फिरकलेदेखील नाही. पंचनामे करण्यासाठी शासकीय बाबू येथे आले होते. नावे टिपण्याचे कर्तव्य बजावत निघून गेले. मदत मिळणार की नाही, हे मात्र सांगितले नाही. मोडलेला संसार कसा उभा करायचा, हा प्रश्न बाधितांसमोर आहे. पुराचे पाणी गावात शिरल्यावर पालकमंत्री गिरीश महाजन हे बोटीतून बचाव कार्यात उतरले होते. मात्र, आता पूर ओसरला. पण नुकसानीचा आढावा घेण्यास कर्तव्य पालकमंत्र्यांनी बजावले नाही, असा एकूण सूर आहे.

घरेच वाहून गेल्याने अनेक परिवार उघड्यावर आले आहेत. निवार्‍याची सोय नसल्याने अनेकांना शाळा, परिसरातील मंंगल कार्यालये या ठिकाणी रात्रीचा मुक्काम ठोकावा लागत आहे. तेथे दानशूरांकडून जेवणाची व्यवस्था केली जाते. मात्र, थोड्या दिवसानंतर ती बंद होईल. मग पुढे काय, हा प्रश्न आ वासून उभ्या असल्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रूंचा महापूर वाहत आहे.


घर गेले वाहून

पुरात घरदार वाहून गेले. घरातील धान्याची पोते, भांडेकुंडे सगळे गेले. जीव वाचविण्यासाठी पळ काढावा लागला. पोरं आजारी आहेत. गोळ्या औषधांसाठी पैसे नाही. आता फक्त अंगावर कपडे शिल्लक आहे. घर नसल्याने मंगल कार्यालयात रहात आहे. मायबाप सरकारने मदत करावी.

शंकर जाधव


दोन गेट वाढवावे

नांदूरमध्यमेश्वर धरणात आठ गेट असून अजून दोन गेट बसवावे. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ असून मागील दहा वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. त्यामुळेदेखील गावात पाणी शिरते. सायखेड पुलाची दरवर्षी डागडुजी करण्याऐवजी नवीन पूल बांधून त्याची उंंची वाढवावी.

अनिल लोखंडे


घर सोडावे लागले

पुरामुळे होत्याचे नव्हते झाले. या संकटात आम्हाला कोणी ढुंंकून पाहिले नाही. घराचे पत्रे गेले, भांडे गेले, कपाट गेले सर्व काही वाहून गेले. कंबरे इतक्या पाण्यात अंगावरील कपड्यावर घर सोडावे लागले. आता शाळेत मुक्काम आहे. कोणी दिली तर खायला मिळते. शासनाने मदत करावी.

सुनीता लोळगे


सगळंं उद्ध्वस्त झालं

पुरामुळे घरातील वस्तू वाहून गेल्या. घराची भिंत खचली आहे. साथीच्या रोगांमुळे घरातील लोक थंडी-तापाने आजारी पडले आहेत. दवाखान्याचे लोक आले होते. गोळ्या देऊन निघून गेले.

अर्चना जाधव


म्हशी वाहून गेल्या

माझा दूधविक्रीचा धंदा असून त्याच्यावर माझा प्रपंच अवलंबून आहे. महापुरात माझी जनावरे दगावली. म्हशी वाहून गेल्या. घोडा मेला. दीड, दोन लाखांचे नुकसान झाले. घर चालवायचे कसे, हा प्रश्न आहे. शासनाने अजून पंचनामेही केले नाहीत.

मच्छिंद्र साळुंके


आकाशाखाली मुक्काम

पुरात घर वाहून गेले. अनुदानातून बांधलेले शौचालयदेखील वाहून गेले. मागील पाच दिवसांपासून शाळेत रहात होतो. सध्या उघड्यावर रहात आहे. शासनाने दखलही घेतली नाही. नुकसान भरपाई मिळावी, ही अपेक्षा आहे.

संजय राठोड


फर्निचर वाहून गेले

आमचा लाकडी फर्निचरला व्यवसाय आहे. ऑर्डर घेतलेले सर्व फर्निचर व लाकडेदेखील वाहून गेली. घरावरुन पाणी वाहत होते. पूर ओसल्यावर परत आलो. घरातील कपडे, वस्तू सर्व वाहून गेले. शाळेत पाच-सहा दिवस काढले.

अंजना सिकलकर

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!