आरोग्यदूत : चमत्कारीत पदार्थ खाण्याची इच्छा
आरोग्यदूत

आरोग्यदूत : चमत्कारीत पदार्थ खाण्याची इच्छा

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आपले मूल माती, वाळू, चुनकळी, खडू, रंग, प्लास्टर, कोळसा, लोकर, राख इ. पदार्थ खात असल्याची तक्रार घेऊन माझ्याकडे कित्येक पालक येतात. एखादा छोटा मुलगा लपतछपत बाहेर पडतो आणि नंतर परत येतो, त्यावेळी त्याचे तोंड कोणत्या तरी चवदार (?) चमत्कारीक पदार्थाने भरलेले असते. असे प्रसंगही क्वचित अगदी आमच्यासमोरच घडतात. या मुलांची खुशामत करून किंवा ओरडून काहीही उपयोग होत नाही. असले असाध्य पदार्थ ही मुले अत्यंत चवीने खात राहतात.

अखाद्य पदार्थ पुन:पुन्हा किंवा सातत्याने खात राहणे म्हणजे ‘पिका’ किंवा चमत्कारीक पदार्थ खाण्याची इच्छा होय. सहसा एक ते दोन वर्षांची मुले असे पदार्थ खातात. परंतु काही वेळा याहून कमी वयाची मुलेही हा प्रकार करतात. लहान मुले किंवा रांगणारी मुले दिसेल ती वस्तू तोंडात घालतात. ही नैसर्गिक गोष्ट आहे. मात्र दोन वर्षांनंतर अशी चमत्कारीक किंवा अखाद्य पदार्थ खाण्याची इच्छा होणे ही अनैसर्गिक आहे.

अशा प्रकारे अखाद्य पदार्थ खाण्याची इच्छा होण्यामागे कॅल्शियमची कमतरता हे कारण असते. अशी पालकांची आणि काळजी वाहकांची एक जोरदार गैरसमजूत असते. परंतु ही गैरसमजूतच आहे. तिच्या काडीचेही तथ्य नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही मुलाला कितीही प्रमाणात कॅल्शियम दिले तरी मूल नको ते पदार्थ खातच राहते. पालकांचे मुलाकडे दुर्लक्ष असण्याचे कारणही या आजारामागे असते. त्यामुळे कदाचित त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मूल तसे करत असू शकते. या मुलांच्या शरीरात कीडे शिरण्याची मोठीच शक्यता असते. तसेच त्यांना शिसे आणि पारा यांची विषबाधा होण्याची शक्यताही असते.

गर्भवती स्त्रियांमध्ये चमत्कारीक पदार्थ खाण्याचे डोहाळे आढळतात. ते पिकासदृशच असतात. त्यांच्यापैकी बहुतेकींनाही रक्तशयाचा त्रास असतो. म्हणजे साहजिकच लोहाची कमतरता असते. त्यामुळे त्यांना सहसा मुल्तानी माती आणि इतर काही गोष्टी खाव्याशा वाटतात.

लोहाचे उच्च प्रमाण असलेले टॉनिक (टोनोफेरॉन पेडिअ‍ॅट्रिक, सी-पिंक, न्युट्रीफॅक्ट्स फे) दिल्यास लगेच सुधारणा होते. बहुतेक वेळा महिन्याच्या आत मुले माती, वाळू इ. खाणे थांबवतात. मुलाला लोहाचे उपचार देण्याआधी त्याचे हिमोग्लोबीन तपासणे आवश्यक असते. शरीराच्या वजनाच्या प्रति किलोमागे 6 मि. ग्रॅ. लोह देणे सुज्ञपणाचे ठरते. हिमोग्लोबिनची पातळी सर्वसामान्य होईपर्यंत टॉनिक देणे आवश्यक असते. त्यानंतर हा डोस प्रतिकिलो वजनामागे 1 मि. ग्रॅ. असा घटवला जातो. अशा प्रकारचा डोस पुढचे दोन ते तीन महिने दिला जातो. यामुळे लांब हाडातील कमी झालेला लोहाचा साठा भरून काढला जातो.

या मुलांनी माती वगैरे खात असताना कित्येक जीवजंतू आणि विशेषत: किडे पोटात ढकललेले असल्यामुळे आतड्यातून त्यांना दूर करण्याची औषधेही दिली गेली पाहिजेत. अलबॅडॅझेल आणि मेबेंडॅझोल ही दोन औषधे सहसा यासाठी वापरली जातात. याशिवाय समतोल आहारासोबत मल्टिव्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे अतिरिक्त डोसही देण्याची शिफारस केली जाते.

Deshdoot
www.deshdoot.com