आरोग्यदूत : टॉन्सिलायटिस
आरोग्यदूत

आरोग्यदूत : टॉन्सिलायटिस

Balvant Gaikwad

अनेक मुलांचे टॉन्सिल्स वाढल्याचे निदान केले जाते आणि त्यामुळे वयानुरुप नियमित आकाराचे टॉन्सिल्स असावेत यासाठी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले जाते. सातव्या वर्षांपर्यंत लिंफविषयक ऊतींची (पेशीजालांच्या ऊतींना पोषक द्रव्य पोहोचवण्यासाठी केश वाहिन्यांच्या भित्तीतून झिरपून बाहेर आलेला रक्तातील द्रवपदार्थ म्हणजे लिंफ होय.) वाढ कळसाला पोहोचलेली असते. टॉन्सिल्स म्हणजे या लिंफ ऊतीच असतात. म्हणून त्यांचा आकार पाच ते आठ वर्षे वयादरम्यान मोठा असतो. सर्वसाधारणपणे सात वर्षांच्या मुलाच्या शरीरात स्ट्रॉबेरीच्या आकाराचे टॉन्सिल्स आढळणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे.

टेक्स्टबुक ऑफ पेडिअ‍ॅट्रिक्स या नेल्सनच्या पुस्तकानुसार, मुलाला जर पुन:पुन्हा घशाच्या संसर्गाचा त्रास होत असेल, तरच टॉन्सिल्सच्या शस्त्रक्रियेचा विचार केला जावा. आदल्या वर्षी सात किंवा त्याहून अधिक वेळा आणि चालू वर्षी पाच किंवा त्याहून अधिक वेळा संसर्ग झालेला असणे म्हणजे वारंवार झालेला संसर्ग. मात्र हा अगदी कडक नियम नाही. याहूनही अधिक वेळा संसर्ग झालेली मुले शस्त्रक्रिया न करताही शारीरिकदृष्ट्या अगदी उत्तम असल्याचे आढळते. शिवाय त्यांना घशाला होणारा संसर्गही कमी होतो.

टॉन्सिल्स काढून टाकण्याचा निर्णय घेण्याआधी इतरही अनेक गोष्टींवर चर्चा केली पाहिजे. आजारपण कितपत गंभीर आहे? मुलांची शाळा किती वारंवार चुकते? मुलाच्या वाढीवर याचा काही विपरित परिणाम झाला आहे का? टॉन्सिल्समुळे काही वैद्यकीय समस्या निर्माण होत नसतील. तर ते काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याचा विचार करण्यापूर्वी टॉन्सिल्सची वाढ गंभीररित्या मोठी झाली आहे. याची खात्री करून घ्यावी. मात्र जैवप्रतिरोधकांच्या योग्य डोसचा वापर केल्यावर ते पूर्वस्थितीला येतात.

गंभीर टॉन्सिलायटिसचा त्रास असलेल्या मुलांमध्ये आढळणारी लक्षणे.घसा वरचेवर किंवा सातत्याने दुखत राहणे.गिळताना त्रास होणे.श्वास घेताना अडथळा येणे.मानेतील ग्रंथींचा आकार वाढणे. जबड्याच्या बरोबर खाली आणि जबड्यात कोनाच्या किंचित पुढे असलेली ग्रंथी सतत सुजलेली असणे. तिचा आकार मोठा होणे.थकवा येणे.भूक न लागणे.वजन अत्यल्प प्रमाणात वाढणे.

टॉन्सिल्सबरोबरच अ‍ॅडेनॉईड्सही तशाच वाढल्या असतील तर घोरणे तोंडाने श्वासोच्छ्वास करणे, झोपेत श्वास बंद होणे आणि अंधरूण ओले करणे ही लक्षणे दिसतात. श्वसनासाठी अधिक उष्मांकांचा वापर केल्यामुळे काही मुलांचे वजन घटते.सायन्युसायटिस किंवा ओटायटिस मीडियाचा त्रास असलेल्या मुलांना टॉन्सिल्स काढून टाकून काहीही लाभ मिळत नाही. ही गोष्ट इथे स्पष्ट केलीच पाहिजे.

सर्दी दूर करण्यासाठी म्हणून टॉन्सिल्स कधीच काढू नयेत.ही शस्त्रक्रिया सहसा सुरक्षितच असते. परंतु काही वेळा तिच्यात गुंतागुंतही निर्माण होतात. कानदुखी, तोंडाला दुगर्ंंधी येणे असे या शस्त्रक्रियेचे दुष्परिणाम काही मुलांच्या बाबतीत आढळले आहेत. प्राणघातक रक्तस्त्राव ही अगदीच क्वचित घडणारी गोष्ट आहे.आधुनिक काळातील प्रगतीमुळे आता जलदगतीने काम करणारी अत्यंत प्रभावी जैवप्रतिरोधके उपलब्ध आहेत.

त्यामुळे कित्येक जणांचे टॉन्सिल्स वाचवण्यात यश येत आहे. उपचार करणार्‍या डॉक्टरांनी या औषधांचा न्याय्यपणे उपयोग करावा आणि योग्य डोस द्यावा. सिफॉलोस्पोरिन्स. (सिफॅड्रॉक्सिल, सिफ्युरोक्झिम अ‍ॅक्झेटिल, सेफीक्झाईम, सेफडिनिर, सेफोडोक्साईम प्रोक्झेटिल) मॅक्रोलाईड्स (एरिथ्रोमायसिन, रोक्झिथ्रोमायसिन, अझिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन) आणि क्लॅव्ह्युलॅनिक अ‍ॅसिडसह अ‍ॅमोक्झिसिलीन ही औषधे अत्यंत सुरक्षित असून बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांपैकी ही अत्यंत सक्षम औषधे आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com