आरोग्यदूत : दडपण
आरोग्यदूत

आरोग्यदूत : दडपण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

एखाद्या नवख्या माणसाशी बोलायचे असले तर मला दडपण येते, गर्दीत गाडी चालवायची म्हटले तर छातीवर दडपण येते, बंद लिफ्टमधून वर चढायचे असले तर मनावर दडपण येते, इ. अनेक प्रसंगी दडपण येण्याच्या तक्रारी काही लोकं करतात. मानसिक दडपणाखाली छातीवर दबाव जाणवतो, मोकळेपणाने श्वास घेता येत नाही. एखाद्या ठराविक वस्तू, जागा, घटना, अवस्था किंवा परिस्थितीमध्ये असाधारणपणे दडपण जाणवणे हा एक मानसिक विकार होय.

अगदी लहानांपासून प्रौढापर्यंत कुणालाही दडपण येऊ शकते. बंद घरात एकटे असताना, एकटे प्रवास करताना, उंचाहून खाली बघताना, गर्दीत वावरताना, कुत्रा, मांजर, पाल झुरळ समोर दिसल्यावर, पाण्यात, आग विस्तवात, सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना, अनोळखी माणसांमध्ये, नवीन जागेत, रक्त दिसल्यावर, इ. अनेक परिस्थितीत दडपण येऊ शकते.

अशा दडपणाखाली वागताना रुग्णाला बेचैन वाटते आणि तसा अनुभव पुन्हा येऊ नये म्हणून ते त्या विशिष्ट परिस्थितीचा टाळाटाळ करतात. दडपण आल्यावर नवख्यांसमोर, सहपाठ्यांशी किंवा अगदी जवळच्या मित्रांशी बोलताना लाजरा बुजरा झाल्यागत होते व संकोची वाटते, चेहरा व घशाचे स्नायू घट्ट होऊन तोंडातून शब्द निघत नाही आणि एकदम बेचैन वाटते. डोक्यात भनभन होऊन बधीर झाल्याने आपले शरीर व अवयव स्वतःला जाणवत नाही.

अंगातून गरम वाफा आल्यासारखे होते तर कधी घामाघूम होऊन थंडी वाजायला लागते. बाजारात वस्तू विकत घेताना अथवा काही व्यवहार करताना इतके बेचैन होते की, समोरचा काय बोलतोय हेसुद्धा लक्षात येत नाही. सामाजिक कार्यक्रमांमध्ये, समूहासमोर बोलताना – वागताना खूप अस्वस्थ होते, सर्वांचे लक्ष्य फक्त आपल्याकडेच आहे असे वाटून एखाद्या सापळ्यात अडकल्यागत अवस्था होते, आपल्या तोंडून काहीतरी निर्बुद्ध चुकीचे बोलले जाईल किंवा काही मूर्खपणाचे वागले जाईल, अशी सतत भीती वाटते. बोलताना आपली आंतरिक भीती इतरांनाही दिसून येईल, याबद्दल चिंता जाणवते. लोकांशी बोलण्याच्या किंवा काही व्यवहार करण्याच्या फक्त विचारानेच मन भयभीत होते. असे अनेक अनुभव दडपण येणारे रुग्ण सांगतात.

मानसिक ताणतणाव, भीतीदायक संवेदनांची जोड, आनुवंशिकता, मन मेंदूतील जीव रासायनिक बदल, काही शारीरिक व मनोविकार अशा अनेक कारणास्तव हा आजार जडतो. रुग्णाला भीतीदायक वाटणार्‍या परिस्थितीला सामोरे जाताना सर्वसाधारण मनुष्याला मात्र कुठलीही भीती वाटत नाही. ही भीती स्थितीनुरुप नसल्याचेही रुग्णाला कळते पण चिंतेपायी तो त्या वस्तू वा स्थितीला पूर्णपणे टाळतो. त्या वस्तू वा परिस्थितीमुळे कुठलेही नुकसान होत नाही, याबद्दल तर्कशुद्ध स्पष्टीकरण दिले तरीही रुग्णाचे समाधान होत नाही.

एका परीसीमेबाहेर विनाकारणच भीती जाणवल्यामुळे रुग्णाला बेचैनी, धडधड, थरकाप, दम, लांब श्वास, छातीत जडपण व वेदना जाणवतात. त्यामुळे अशा त्रासदायक परिस्थिती एकतर टाळल्या जातात किंवा भीतीने पार पडल्या जातात.

दारू व तत्सम पदार्थांचे व्यसन हा मनोविकार जडण्यामागे बर्‍याचदा मनावरील दडपण हे महत्त्वाचे कारण असते. तसेच दडपण जाणवणार्‍या रुग्णांमध्ये डिप्रेशन या आजाराचे प्रमाण जास्त आढळते. लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे लक्षणे नियंत्रणात येऊ शकतात. औषधी सोबत क्रमवार संवेदन, शिथीलिकरण, आचरणातील बदल, कॉग्निटिव थेरपी, व्यवहार कौशल्य अशा अनेक प्रकारच्या उपचार पद्धती गरजेनुसार वापरता येतात.

Deshdoot
www.deshdoot.com