आरोग्यदूत : गर्भावस्था
आरोग्यदूत

आरोग्यदूत : गर्भावस्था

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

गर्भधारणेच्या संपूर्ण कालावधीत, बाळंतपणाच्या प्रसंगी आणि स्तनपानच्या कालावधीत आपल्या शरीरात काय काय बदल होत असतील, या बदलांचे आपल्या जीवनशैलीवर लगेच आणि दूरवरचे काय परिणाम होतील, याबद्दल तिच्या मनात जशी उत्सुकता असते तशी भीतीदेखील वाटत असते. गर्भधारणेची ‘बातमी’ ही सहसा त्या महिेलेसाठी आनंददायी वार्ता असते.

सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्वसाधारणपणे पन्नास टक्के स्त्रियांना मळमळणे, उलटी-चकरा येणे, वास सहन न होणे वगैरे त्रास होतो. या शारीरिक त्रासासोबत मना थोडीशी निराशा, चिडचिडेपणा, कंटाळा असतो. ‘बातमी’ कळाल्यानंतरच आनंद आणि लगेच थोडीशी निराशा आणि चिडचिडेपणा हे एकंदरीत, मानसिक संतुलन काही प्रमाणात का होईना, बिघडल्याचे लक्षण आहे. हे समजून घेतले पाहिजे.

चौथ्या-पाचव्या महिन्यांनंतर ही अवस्था बदलते. जरा बरे वाटायला लागते. गर्भवती झाल्याचा आनंद तर असतोच. त्यासोबत एक स्त्री म्हणून आपल्यात काही त्रुटी नाही याचे समाधानसुद्धा असते. बाळाची हालचाल जाणवायला लागते. बाळ कधी खूपच हालचाल करते तर कधी खूपच कमी. एक नवीनच, पण मजा देऊन जाणारी अनुभूती. माझे बाळ पाहिजे तसे हालचाल करत नाही. ही अवस्था तिच्या मनाची बेचैनी वाढवू शकते. जशी ती आठव्या महिन्यांत पदार्पण करते आणि बाळंतपणाच तारीख जवळ यायला लागते, तशी ती पुन्हा डिस्टर्ब होते. कसे होईल? सगळे काही नीट होईल ना? असे सारखे मनात राहते.

बाळंतपणाच्या कळा कशा असतील. आपले बाळ निरोगी जन्माला येईल की नाही वगैरेसारख्या कारणाशिवाय, आपले दिसणे बिघडलेय, असे कुठेतरी तिला वाटायला लागते. प्रसूतीनंतर इतक्या छोट्या बाळाशी आपण अ‍ॅडजेस्ट होऊ शकू की नाही. बाळंतपणानंतर आपली लाईफस्टाईल कशी असेल, या आणि अशा प्रकारच्या अनेक बारीकसारीक, पण मनाची चलबिचलता वाढवणार्‍या विचारांचा प्रवास हा चालूच असतो. एका बाजूला सगळे काही सुखरुप होईल की नाही, अशी हुरहूर, तर दुसरीकडे लवकरच मातृत्व प्राप्त होणार याचा आनंद, मुलगा होणार का मुलगी याची उत्सुकता, नॉर्मल होणार का सिझर याचा गोंधळ, अशा चमत्कारिक मानसिक अवस्थेतून तिला जावे लागते. सर्वार्थाने स्त्री म्हणून जन्माला आल्याची, अपत्याला जन्म देण्याची, निसर्गाने घेतलेली ही परीक्षाच असते. या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी प्रामुख्याने घरात दोन व्यक्ती असतात. एक म्हणजे ‘आई’ आणि दुसरी ‘सासू’, मोठी वहिनी, आत्या, मावशी, काकू वगैरे कोणी असल्यास परीक्षेची तयारी कडक (!) होते. हे खाऊ नको, ते खा; असे करू नकोस, तसे कर; जरा आराम कर; भरपूर काम करावे म्हणजे बाळंतपण नॉर्मल होईल; अमूक असे होतेय का? मग मुलगाच होईल. तमूक तसे होतेय का? मग मुलगीच होईल. या अशा आणि अनेक सूचना आणि कॉमेंट्सने, काय योग्य आणि काय अयोग्य ही द्विधा संपत नाही.

स्त्रियांना मुळातच पुरुषांच्या तुलनेत अधिकची काळजी करण्याची सवय असते असे म्हणतात. गर्भावस्थेत तिची काळजी करण्याच्या कारणांची यादी वाढते. एका मर्यादेच्या पुढे मानसिक ताण वाढल्यास तो गर्भपात होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. मानसिक ताण हा गर्भावस्थेतील पहिल्या तीन महिन्यांत आणि शेवटच्या तीन महिन्यांत जास्त असतो. असे आढळून आले आहे. त्यातही पहिल्या तीन महिन्यांत तो जरा जास्त असतो. नैसर्गिक गर्भपात होण्याची शक्यतादेखील पहिल्या तीन महिन्यांतच अधिक असते. या गर्भपाताच्या जास्त असण्याच्या प्रमाणाचा आणि मानसिक ताणाचा संबंध आहे. अस लक्षात आलेले आहे. नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर बाळंतपण होण्याऐवजी सातव्या महिन्यांतच अथवा पूर्ण दिवस भरण्याआधी बाळंतपण झाल्यास अनेक शारीरिक कारणांशिवाय अशा बाळंतपणाच्या पूर्वीच्या आठवड्यातील प्रमाणाबाहेर मानसिक त्रास देणार्‍या घडलेल्या घटना कारणीभूत ठरू शकतात. (उदाहरणार्थ, कुटुंबातील अगदी जवळच्या नातेवाईकाचा अचानक मृत्यू, भरपूर आर्थिक नुकसान वगैरे.)

गर्भवती महिलेची मानसिक अवस्था ‘अजब’ झालेली असते. गर्भावस्था आणि अपत्य जन्म या चिरकाल आनंद देणार्‍या घटना सद्यस्थितीत आणि भविष्यात, मनावरचा ताण वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
गर्भवती महिलेच्या मनातील अंतरंग जरा विस्ताराने समजून घेण्यासाठी तिची गर्भधारणेपूर्वीची मानसिक अवस्था कशी आहे, हेदेखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून आपल्याला तिच्या मनाचा बिनचूक वेध घेता येईल.

Deshdoot
www.deshdoot.com