आरोग्यदूत : फुगलेल्या शिरा
आरोग्यदूत

आरोग्यदूत : फुगलेल्या शिरा

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

रक्तचक्रातील विषचक्र 

सर्व शरीरातील अशुद्ध रक्त हृदयाकडे शुद्धीकरणासाठी नेणार्‍या शिरांना नीला म्हणतात. पायाकडून हृदयाकडे जाणार्‍या नीलांना गुरुत्वाकर्षणविरुद्ध काम करावे लागत असल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी नीलांमध्ये काही इंचाइंचावर झडपा असतात. त्यामुळे  अशुद्ध रक्त हृदयाकडे नेले जाते. काही कारणांनी झडपा नाजूक झाल्या. खराब झाल्या, त्यांची आकुंचनशक्ती कमी झाली तर रक्त पायाकडे थबकून राहते. असे रक्त हृदयाकडे जाण्याऐवजी तळपायाकडे जाऊ लागते. त्यामुळे पायातील नीलांवर अतिरिक्त ताण पडून त्या फुगीर होतात. गुदद्वाराकडील नीलांच्या बाबतीत असे घडल्यास त्याला मूळव्याध म्हणतात.

त्रासदायक पण जीवघेणे नाही

सुरुवातीच्या काळात ‘केवळ दिसायला वाईट दिसते’ एवढ्यापुरतेच लक्षण असते. नंतर हळूहळू पायाला जडपणा वाटणे, दिवसभर उभे राहायला लागल्यास सूज येणे, वेदना वाढणे असे होते. नंतर सातत्याने घोट्याभोवती सूज राहणे, खाज येणे, रात्री झोपताना फुगलेल्या शिरा ठसठसल्यासारख्या दुखणे, पोटर्‍यात गोळे येणे अशी लक्षणे दिसतात. वर्षानुवर्षे दुर्लक्षित ‘वेरीकोज व्हेन्स’मध्ये घोट्याभोवती एखादी नीला फुटून त्यातून रक्तस्त्राव होणे असे दुष्परिणाम दिसू शकतात.

‘पांव भारी होता’

गर्भवतीला फुगीर शिरांचा त्रास जास्त प्रमाणात होऊन पाय खरोखरच जड होतात. पोटात वाढणार्‍या गर्भाचा दाब नीलावर पडल्यामुळे वाढीव हार्मोन्सच्या परिणामामुळे तसेच गर्भाशय आणि ओटीपोटाकडे वाढलेला रक्तपुरवठा या तिहेरी कारणांमुळे पायाकडे अशुद्ध रक्त साठून फुगीर शिरांचा त्रास होऊ शकतो. सहसा हा त्रास बाळंतपण उरकले की आपोआपच कमी होतो.

नखरेवाली नाजूक नीला 

बराच वेळ नुकतेच उभे राहून काम करणार्‍या लोकांतही हा त्रास अधिक आढळतो. दंतवैद्य दुकानातील विक्रेते, पोलीस, पोस्टमन, इ. लोक या गटात मोडतात. बद्धकोष्ठ होणार्‍यांनाही हा त्रास होतो. अनुवांशिकतेमुळे जन्मत:च नीला नाजूक असल्यामुळे असे होऊ शकते. एखाद्या स्त्रीची आई, मावशी, आत्या याने बाधित असेल तर त्या स्त्रीलाहा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. फुगीर शिरांचा त्रास होतो आहे असे वाटत असल्यास अथवा काही त्रास नसेल तर पुढील काळजी घेण्याने फायदा होतो. कारण तो त्रास होऊ नये याचेही उपचार तेच आहेत.

तंग, तलम, तोकडी तुमान

त्वचेखालील नीलांना बाहेरून आधार दिल्यास त्या अधिक चांगल्या प्रकारे रक्त हृदयाकडे वाहून नेतात. त्यासाठी पायाला तंग बसणारे मोजे, स्टॉकिंग वापरावे. बाजारात ते क्रेप कापडाचे इलॅस्टिकयुक्त मिळतात. पोटरीच्या शिरा फुगीर असतील तर तिथपर्यंत; पण मांडीतही त्रास असेल तर जांघेपर्यंत मोजे घ्यावेत. मात्र कमरेला घट्ट असणारे कपडे, दुपट्टे टाळा.

उद्धट बनो 

एकाच जागी जास्त वेळ बसून राहू नका. पायांची आढी घालून बसू नका. कामानिमित्त, प्रवासानिमित्त बराच वेळ बसून राहावे लागल्यास जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पाय मोकळे करा. शक्य असेल तेथे उद्धव माणसासारखे बसा. म्हणजेच पाय लोंबते खाली न सोडता समोरच्या खुर्चीवर, टीपॉयवर ठेवून बसा. त्याने पायाकडील नीला रिकाम्या होण्यास मदत मिळते. एकाच जागी बराच वेळ नुसते उभे राहणे टाळा. दर 15-20 मिनिटांनी कदमताल हा व्यायाम अथवा चवड्यांवर उभे राहणे ही कसरत करावी. परेडमध्ये बराच वेळ ‘सावधान’ या अवस्थेनंतर कदमताल आदेश देण्यामागचा उद्देश तोच असतो.

हटयोगी नको, योगी व्हा

वजन घटवा. लठ्ठपणामुळे नीलांवर अधिक तार पडतो. हटयोग्याप्रमाणे पाण्यावर चालण्याच्या बाता न करता पाण्यात चालण्याचा व्यायाम करा. त्यामुळे पायाच्या नीलांवर चांगला दाब पडून त्यातील रक्त हृदयाकडे फेकले जाण्यास मदत होते. साधे जमिनीवर चालणेदेखील फायदेशीर ठरते. पोटरीच्या स्नायूंचे बल त्यामुळे वाढते. ते पंपासारखे काम करून रक्त वरच्या (उर्ध्व) दिशेला फेकतात. चालताना वर सांगितल्याप्रमाणे मोजे अथवा पूर्वी पोलीस पोटर्‍यांना बांधीत तसे पट्टे बांधावेत.

चवडे ठेवा चवडीवर 

सकाळी झोपेतून उठताना आणि  दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा उताणे झोपून दोन्ही पाय भिंतीलगत 2 मिनिटे वर ठेवावे. याने रक्त पायाकडे साठून राहणार नाही. अशा अवस्थेतच पायात स्टॉकिंग चढवणे अधिक चांगले असते. संध्याकाळी कामावरून आल्यानंतर अथवा रात्री झोपण्याआधी पायांचे चवडे, घोटे, उश्यांची चवड रचून त्यावर धरावेत. असे एक तास पडून राहावे.

या उपायांनी फायदा न झाल्यास सर्जन या शिरांमध्ये एक इंजेक्शन देऊन त्या नष्ट करतील. अथवा शस्त्रक्रियेने काढून टाकतील. अशा काही नीला काढल्या तरी पायातील इतर नीला त्यांचे काम करण्यास सक्षम असतात.

शेवटी थोडी गंमत- वजन कमी करण्यासाठी पुढे दिलेला एक व्यायाम सोपा आणि फार उपयोगी पडतो. जेवताना कोणीही दुसर्‍यांदा वाढायला आले की, डोके या खांद्यापासून त्या खांद्यापर्यंत हलवणे हा तो व्यायाम आहे.

Deshdoot
www.deshdoot.com