पारनेर : राज्याच्या विविध भागांत महाआरोग्य शिबिरे घेणार – ना. गिरीश महाजन

0
 राळेगणसिद्धी येथील महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद
पारनेर (प्रतिनिधी) – राळेगणसिद्धी येथे जसे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले, तसेच राज्याच्या विविध भागांत आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक गरजूला आरोग्य सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात आयोजिलेल्या महाआरोग्य शिबिरात मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असून येथे आलेल्या प्रत्येक रुग्णावर उपचार केले जाणार आहेत.
ज्यांच्यावर पुढील उपचार अथवा शस्त्रक्रिया आवश्यक आहे, त्यांच्यावर येत्या काही दिवसांत शस्त्रक्रिया केल्या जातील. त्यामुळे हे शिबिर केवळ एका दिवसापुरते नसून येथे नोंदणी केलेल्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि सर्व उपचार मोफत करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे शांतिनिकेतन क्रीडांगणावर मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजीत माने यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ना. महाजन यांनी, महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांशी जोडले गेल्याचा अनुभव आपणाला येत असल्याचे सांगून ग्रामीण भागात या शिबिराच्या आयोजनासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच विविध संस्था-संघटना, सेवाभावी कार्यकर्ते, विद्यार्थी, शिकाऊ डॉक्टर परिश्रम घेत होते. आजच्या या गर्दीने त्यांच्या परिश्रमाला यश आल्याचे समाधान वाटत आहे. राज्यातील 12 वर्षांखालील सर्व मूकबधीर मुले आपण दत्तक घेतली असून त्यांना शोधून त्यांच्यावर आवश्यकतेप्रमाणे उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शासन यंत्रणेबरोबरच सीएसआरच्या माध्यमातून त्यांना महागडे उपचारही मोफत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ना. महाजन यांनी सांगितले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले, मानवसेवा ही खर्‍या अर्थाने ईश्वरसेवा आहे. त्यामुळे अशा महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आजारमुक्त महाराष्ट्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. या ग्रामीण आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गावखेड्यातील गरीब रुग्णांना विविध आजारांवर नामवंत डॉक्टरांकडून उपचार मिळणार असल्याबद्दल विशेष समाधान मिळत आहे.
यावेळी आयुषचे संचालक डॉ. कुलदीप राज कोहली, ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, डीएमईआरचे संचालक प्रवीण शिनगारे, पद्मश्री डॉ. के.एच. संचेती, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, डॉ. शेखर भोजराज, डॉ. जयश्री तोडकर, डॉ. गौतम भन्साळी, डॉ. रागिणी पारेख, महाराष्ट्र आयुर्वेद कौन्सीलचे अध्यक्ष, डॉ. आशुतोष गुप्ता, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. म्हैसेकर, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, महाराष्ट्र होमिओपॅथीक कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. पी. बोरुटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश औटी आदी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी विविध तपासणी कक्षांना भेटी देऊन पाहणी केली, तसेच डॉक्टरांशी आणि आलेल्या रुग्णांशीही संवाद साधला. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांच्या सर्व यंत्रणा, आरोग्य विभाग आदी यात सहभागी झाल्याने हे महाआरोग्य शिबिर यशस्वी ठरले. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर जास्तीचे वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय (ससून रुग्णालय) पुणे, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर, गुणे आयुर्वेद महाविद्यालय, होमिओपॅथिक महाविद्यालय, विविध ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी-शिकाऊ डॉक्टर यांचा या महाआरोग्य शिबिरात सहभाग होता. नियोजनासाठी शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या यांनी मोलाची भूमिका बजावली.

आबालवृद्धांची गर्दी
आपल्यावर चांगले उपचार व्हावेत, यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून आबालवृद्ध याठिकाणी आल्याचे चित्र पाहायला मिळाले. कुणी लहान मूल घेऊन तर कुणी आपल्या वृद्ध आईवडिलांना घेऊन याठिकाणी आले होते. याठिकाणची व्यवस्था पाहिल्यावर तसेच तपासणी आणि उपचारानंतर या रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहर्‍यावर असणारे समाधानाचे भाव या महाशिबिराचा उद्देश सफल झाल्याचेच जणू सांगत होते.

राळेगणसिद्धी येथे शिबिरस्थळी पहाटेपासूनच विविध भागांतून रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक येण्यास सुरुवात झाली होती. सकाळी 7 वाजल्यापासूनच नावनोंदणी कक्षात रुणांची रीघ लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्याठिकाणी त्यांना आजाराचे स्वरुप लक्षात घेऊन तसेच संदर्भ कार्ड पाहून विविध कक्षात तपासणी व उपचारासाठी पाठविण्यात येत होते. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सोईसाठी दंत, हाडे, स्त्रीरोग, जनरल, श्वसनविकार, नेत्ररोग, जनरल सर्जरी, लठ्ठपणा, मेंदूरोग, मनोविकार, कान-नाक-खसा, कर्करोग, अनुवंशिक आजार, मूत्ररोग, प्लॅस्टिक सर्जरी, त्वचारोग, ह्रदयरोग, बालरोग यासह आयुष, युनानी असे विविध तपासणी कक्ष उभारण्यात आले होते. महाआरोग्य शिबिराच्या नियोजनासाठी नेमलेले विद्यार्थी स्वयंसेवक रुग्णांना या कक्षात घेऊन जात होते. रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठीची प्रत्येक यंत्रणा धावपळ करतानाचे चित्र शिबिरस्थळी पाहायला मिळाले.

 

LEAVE A REPLY

*