विषारी ताडी सेवनाने एकाचा मृत्यू

0
नाशिक | दि. २ प्रतिनिधी – इगतपुरी तालुक्यातील धामणी येथ ताडीचे अती सेवन केल्याने बेशुध्द पडलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१) दुपारी घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा इगतपुरी तालूक्यातील ताडी प्रकरण चर्चेत आले असून याची चौकशीची मागणी होत आहे.

दीपक गोरख भोर (३४ रा.धामणी ता.इगतपुरी) असे या प्रकरणात मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक भोर याने शुक्रवारी दुपारी ताडीचे अती सेवन केले होते. यामुळे तो सायंकाळी बेशुध्द अवस्थेत मिळून आला. त्यास त्यास धनाजी भोर यांनी नजीकच्या धामणगाव येथील एसएमबीटी महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल केले असता डॉ.एस.आर वाघ यांनी त्यास मृत घोषीत केले.

याप्रकरणी घोटी पोलिसात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार बिपिन जगताप, कासार, सानप गायकवाड करीत आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या दशकात इगतपुरी तालका विषारी ताडीचा प्रश्न चर्चेत गाजला होता.

नैसर्गिक ताडीच्या नावाखाली विकण्यात आलेल्या भेसळ ताडीमुळे अनेकांचे प्राण गेल्यानंतर राज्यभरात खळबळ माजली होती. यामुळे राज्य शासनाला जिह्यातील ताडी व्यवसाय बंद करण्याची वेळ आली होती. नैसर्गिक ताडी म्हणून विकण्यात येणारा पदार्थ हा पाण्यामध्ये सर्रास आमली पदार्थयुक्त पावडरीची भेसळ करून तयार होत असल्याचे तपासात पुढे आले होते. यामुळे शासनाच्या आदेशाने जिल्हाप्रशासनाने तडकाफडकी दुकाने तसेच ताडी विक्री बंद करण्याचे आदेश जारी केले होते.

हे प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा काही व्यक्तींच्या हितसबंधांमुळे तसेच महसूल मिळण्याच्या आपेक्षेपे गेल्या दिड ते दोन वर्षांपासून पुन्हा ताडीची विक्रीस जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदिल दाखवला होता. यामुळे ताडीची दुकानदारी सुरू झाली होती. मात्र इगतपुरी परिसरातच ताडीमुळे एका युवकाचा मृत्यू झाल्याने ताडीचा हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता पोलीस तसेच जिल्हाप्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*