हजसाठी पहिल्याच दिवशी 300 यात्रेकरु रवाना

0

देशात एकोप्यासाठी अल्लाहकडे दुआ मागा : खा. गुलाम नबी आझाद

नगर जिल्ह्यातून यंदा 350 यात्रेकरु जाणार

देवगड फाटा (वार्ताहर)- मुस्लीम धर्मियांत सर्वात पवित्र हज यात्रेसाठी भाविकांच्या प्रस्थानास प्रारंभ झाला असून काल 13 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथून विमानाची दोन उड्डाणे झाली. त्यातून 300 भाविक हज यात्रेसाठी सौदी अरेबियाकडे रवाना झाले. औरंगाबाद येथील जामा मस्जिद प्रांगणात यात्रेकरुंना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, काँग्रेस नेते मोहन प्रकाश, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख, महाराष्ट्र हज यात्रा कमिटीचे अध्यक्ष हाजी ईब्राहीम अर्शद इंजीनियर आदी उपस्थित होते.

यावेळी गुलाम नबी आझाद म्हणाले, देशात एकोपा रहावा, अमन-शांती रहावी यासाठी हज यात्रेसाठी जाणार्‍या हाजींनी अल्लाहकडे दुवा मागावी. काबा शरिफ हे जगातील सर्व मुस्लीम धर्मियांचे पवित्र शिर्ष आहे. हजारो वर्षापासून काबा शरिफच्या दिशेने जगात नमाज पठन केले जाते. मी चारवेळा वेगवेगळ्या नैसर्गिक वातावरणात हज केले आहे. ज्याच्या मनात द्वेष आहे अशांना अल्लाह सद्बुद्धी देवो. हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई या देशाचे वेगवेगळे फुगे आहेत असे सांगून हज यात्रेकरुनंना शुभेच्छा दिल्या.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार अब्दुल सत्तार, हज कमिटीचे राज्य अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले.
यावर्षी हज यात्रेसाठी हज कमेटीद्वारे अहमदनगर जिल्ह्यातून 350 हाजी औरंगाबाद येथून विमानाद्वारे जाणार आहेत. औरंगाबाद येथून औरंगाबाद, अहमदनगर, जालना, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातून 2680 भाविक हज यात्रेसाठी जणार आहेत. 13 ते 21 ऑगस्ट पर्यंत दररोज दोन विमानांद्वारे हाजी मक्का मदिना येथे पोहचणार आहेत. 22 ऑगस्ट रोजी एकच विमान जाणार आहे.

हज यात्रेकरुन शुभेच्छा देण्यासाठी औरंगाबादच्या जामा मस्जिद येथे हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी गुलाम नबी आझाद यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कानडगाव येथील यात्रेकरु करीम पटेल, रहेमान शेख, इस्माईल पटेल हाजी हारुण आदींचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

*