डोक्यावर केस उगवण्याच्या नादात तरुण उद्योजकाचा मृत्यू

0
मुंबई: मुंबईतील साकीनाका येथील तरुण उद्योजकाचा केशरोपणानंतर ५० तासांनी शनिवारी मृत्यू झाला. श्रावण कुमार चौधरी (वय ४३) असं या उद्योजकाचं नाव आहे. केशरोपणाच्या प्रक्रियेदरम्यान आरोग्य सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर केशरोपणानंतर झालेल्या जीवघेण्या अॅलर्जीमुळं त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळेल, असंही सांगण्यात आलं.

वृत्तानुसार, श्रवण कुमार चौधरी (43) असं या मृत व्यक्तिचं नाव आहे. स्वतःचा व्यवसाय असलेल्या चौधरी यांनी गुरुवारी चिंचपोकळी येथील एका रुग्णालयात केस उगवण्याची शस्त्रक्रिया केली होती. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला म्हणून ते पवईतल्या हिरानंदानी रुग्णालयात पोहोचले. त्यांचा चेहरा आणि गळ्यावर सूज आली होती. ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना ही एनाफिलॅक्सिस नावाची एक प्रकारची अॅलर्जी असल्याचा संशय आला.

ही अॅलर्जी प्रतिजैविक असलेल्या औषधांमुळे उद्भवली असावी, असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यामुळे चौधरी यांना त्वरित दाखल करण्यात आलं. मात्र, शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. चौधरी यांनी पंधरा तासांहून अधिक काळ चालणाऱ्या प्रक्रियेदरम्यान जवळपास ९५०० केसांचे प्रत्यारोपण करून घेतले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

या प्रकारामुळे डॉक्टरही अचंबित झाले आहेत. कारण, सहसा अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये मृत्यू ओढवत नाही. चौधरी यांना प्रतिजैविकांच्या अॅलर्जीमुळे मृत्यू आला असावा, असा त्यांचा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचं कारण स्पष्ट होणार आहे. मात्र, या प्रकारामुळे चौधरी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

*