हैद्राबादच्या सराईताचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस कोठडीत ब्लेडने करून घेतले वार

0

नाशिक । घरफोड्या, चेनस्नॅचिंग, जबरी लूट अशा 54 गुन्हे दाखल असलेल्या व सध्या नाशिक पोलीसांनी अटक केलेल्या हैदराबाद येथील अट्टल सराईताने ब्लेडने शरीरावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना काल घडली.

महमंद मुजीब अफान बीन उर्फ सलमान उर्फ गोरे मुजीब (25, रा. शिंगरावस्ती, हैदराबाद) असे या सराईताचे नाव असून त्याच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयातील गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयात मंगळवारी (दि.10) दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

महमंद मुजीब अफान बीन उर्फ सलमान उर्फ गोरे मुजीब यावर हैदराबाद येथे 54 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यास अटक केल्यानंतर त्याने बेडीसह हैदराबाद पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला होता.

त्यानंतर सहा महिन्यांपुर्वी नाशिकला आल्यानंतर स्थानिक गुन्हेगारांंच्या मदतीने त्याने टोळी करून शहरात चैनस्नॅचिंग आणि घरफोड्या सुरू केल्या होत्या. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून बिन याच्यासह इतर 2 साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत 11 गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली आहे. यामधील 16 तोळे सोने व एक दुचाकी असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल नाशिक पोलीसांनी जप्त केला आहे.

त्यास पोलीसांनी पंचवटी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. न्यायालयात हजर करण्यासाठी त्याला नेण्याआधी पंचवटी पोलीस ठाण्याच्या कोठडीतून त्यास बाहेर काढले. मात्र तेथे पोलिसांची नजर चुकवून त्याने ब्लेडचा तुकडा स्वत:जवळ ठेवला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस मुख्यालय येथील युनिट एकच्या कार्यालयात बीन यास ठेवण्यात आणले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बीन याने शौचालयास जायचे आहे असे सांगितले.

पोलिसांनी त्यास कार्यालयाच्या शौचालयात नेले असता त्याने आतमध्ये जाऊन ब्लेडने कपाळ, हात आणि छातीवार वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी धाव घेत त्यास अटकाव केला. तसेच त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले.

त्याने करून घेतलेल्या जखमा किरकोळ असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगीतले. दरम्यान बीनवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे त्याची रवानगी नाशिकरोड येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*