राहुरीत गुरूमाऊलींच्या सत्संग मेळाव्याची तयारी सुरू

0

देवळाली प्रवरा (वार्ताहर) – श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील गुरूकुल पिठाचे पिठाधीश गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या दि. 15 ऑगष्ट रोजी होणार्‍या राहुरी येथील मेळाव्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.नगर जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातूनही असंख्य सेवेकरी सत्संग मेळाव्यासाठी येणार असल्याने सत्संगासाठी 60 हजार चौरस फुटाच्या मंडपाची उभारणी चालू झाली आहे.

राहुरी येथील कोरडेमळा येथे प.पू. गुरूमाऊलींचा सुमारे 17 वर्षानंतर राहुरीत मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून दहा हजारांच्यावर सेवेकरी येणार असल्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे.
त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. भाविकांसाठी दीड एकर जागेत 60 हजार चौरस फुटाच्या सभामंडपाची उभारणी करण्यात येत आहे. तसेच गुरूमाऊलींसाठी भव्य सुशोभित व्यासपीठ उभारण्यात येणार आहे.

मेळाव्यासाठी येणार्‍या भाविकांच्या वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणात भोजन व्यवस्था करण्याची तयारी सुरू आहे. मेळाव्याचा प्रचार-प्रसार होण्यासाठी सजविलेल्या रथातून श्रीस्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्थापन करण्यात आली असून विद्युत रोषणाईने सुशोभित केलेला हा रथ तालुक्यातील प्रत्येक गावात जात आहे.

रथासोबत असलेले सेवेकरी गावागावात व्हिडीओ व ऑडिओद्वारे मेळाव्याची माहिती देत आहेत. या मेळाव्यासाठी राजकीय, सामाजिक व अध्यात्मिक सेवेतील सेवेकरी उपस्थित राहणार आहेत.
मेळावा यशस्वीपणे पार पडण्यासाठी महिला व पुरूष सेवेकरी परिश्रम घेत असल्याची माहिती बाबाजी धनवडे व सतीश इंगळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*