‘डॉ. तनपुरे’साठी वास्तूशास्त्राप्रमाणे बदल आवश्यक : गुरूमाऊली मोरे

0

राहुरी (प्रतिनिधी) – साखर सम्राटांचा महाराष्ट्र शिक्षण सम्राटांकडे वळल्याने जिल्ह्यातील एक नंबरच्या राहुरी कारखान्याची दुरवस्था झाली. डॉ. तनपुरे साखर कारखाना जगात एक नंबरचा व्हावा, यासाठी वास्तुशास्राप्रमाणे काही बदल करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले.

राहुरी येथील महाविद्यालय रोडलगत प.पू. गुरूमाऊली यांच्या राष्ट्रीय महासत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवेकर्‍यांना अमृतुल्य हितगूज करताना ते बोलत होते. डॉ. विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, जि.प. सदस्य शिवाजीराव गाडे, आमदार शिवाजी कर्डिले, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, डॉ. उषाताई तनपुरे, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

गुरूमाऊली म्हणाले, देशातील शेतकरी सुखी होण्यासाठी परदेशाप्रमाणे चांगले रस्ते, चांगली शेती ही संकल्पना भारतदेशाने राबावी. नामांकित कृषी विद्यापीठ राहुरीत आहे. विद्यापीठाने शेतकर्‍यांना प्राधान्य देऊन शेतकरी मेळावे घ्यावेत. तरच नवीन शेतकरी तयार होतील. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कदम, राहुरी तालुका प्रमुख बाबाजी धनवडे, विजय कडू यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमा अगोदर सामुहिक दुर्गासप्तशतीचे पाठ व स्वामी चरित्राचे पारायण करण्यात आले. कविता जेजूरकर यांनी निवेदन केले. मेळाव्यास उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, शिवाजी डौले, विजय तनपुरे, रावसाहेब तनपुरे, डॉ. निलेश भोईटे, नरेंद्र शिंदे, विजय डौले, सतीश इंगळे, मच्छिंद्र कोहकडे, सचिन ठुबे, उद्धवराव सोनवणे, भूषण घोलप, आदींसह राज्यभरातून सेवेकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*