Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

बंडखोरीमुळे गुरुमाऊली मंडळाच्या प्रतिमेस तडा

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या पदाधिकारी निवडीमध्ये सत्ताधारी गुरुमाउली मंडळाअंतर्गत बंडखोरीने मंडळाच्या चांगल्या प्रतिमेस तडा गेला आहे. गेली तीन वर्ष अत्यंत चांगला कारभार केला म्हणून बँकेचा प्रत्येक सभासद गुरुमाऊली मंडळाच्या कारभाराचे कौतुक करीत असताना केवळ पदे मिळविण्यासाठी काही संचालकांनी अंतर्गत बंडाळी केल्याने मंडळाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.

मंडळाचे सर्वेसर्वा बँकेचे माजी अध्यक्ष व राज्याचे संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले यांनी कारभार करताना सर्वांना विश्वासात न घेतल्यामुळे बंडखोरी करण्याची वेळ आली असे समर्थन नूतन पदाधिकार्‍यांकडून केले जात आहे. त्यामुळे गुरुमाऊली मंडळावर प्रेम करणार्‍या जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कारण ज्यांनी बंडखोरी केली असे बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन साहेबराव अनाप हे रोहोकले गुरुजींचे अत्यंत विश्वासू समजले जात होते. परंतु त्यांच्यावर बंडखोरी करण्याची वेळ का आली ? हा प्रश्नसुद्धा जिल्ह्यात चर्चिला जात आहे.

गेली तीन वर्ष रोहोकले गुरुजी चेअरमन असताना बँकेमध्ये सभासद हिताचे अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. अगदी विरोधक सुद्धा बँकेच्या कारभाराची खाजगीमध्ये प्रशंसा करीत असतात. गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष व जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये प्रिय असलेले बापूसाहेब तांबे व रावसाहेब रोहोकले यांच्यात बँकेच्या निवडणुकीनंतर सुरुवातीपासूनच मतभेद निर्माण झाले. मी जिल्ह्याचा नेता असून मी घेतलेले निर्णय सर्वांनी मान्य केले पाहिजे अशी रोहोकले गुरुजींची भूमिका होती व त्यातूनच त्यांनी मंडळ व संघटनेचे पदाधिकारी तसेच बँकेचे संचालक यांच्याशी फारसा विचारविनिमय न करता निर्णय घेतले व राबविले असा एका गटाचा आरोप आहे तर दुसरीकडे बापूसाहेब तांबे हे मंडळाचे अध्यक्ष असून वयाने जरी लहान असले तरी त्यांच्या पदाचा मान राखत त्यांना विश्‍वासात घेऊनच कामकाज करायला पाहिजे होते.

मात्र गेली दोन वर्षे ते बँकेच्या सर्व कारभारापासून अलिप्त राहिले. त्यांनी रोहकले गुरुजींच्या कामकाजात कोणताही अडथळा आणला नाही. आता रोहोकले गुरुजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांनी बाजूला होऊन आम्हाला काम करू द्यावे अशी तांबे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. या सर्व घडामोडींमध्ये बँकेचे माजी पदाधिकारी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष रावसाहेब सुंबे व नाशिक विभागीय संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब जगताप यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचीही जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.

रोहोकले गुरुजींच्या कार्यपद्धतीवर नाराज असणारे सर्व घटक एकत्र आल्याने हे सत्तांतर झाले असले तरी पदाधिकारी निवडीच्या मीटिंगमध्ये बापूसाहेब तांबे यांनी सर्व वीस संचालक गुरुमाऊली मंडळाचे असून इथं कोणतेही मतभेद नाहीत असे सांगून सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. दुसरीकडे रोहोकले गुरुजींच्या वस्तीवर शनिवारी झालेल्या चिंतन बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी गुरुजींनी ठराविक लोकांचे ऐकल्यामुळे ही वेळ आली. त्यांना सल्ला देणार्‍या सल्लागारांनी हातचे राखून सल्ले दिले. त्यामुळे काही लोक नाराज झाले व ते बाजूला गेले असे सांगून दोन्ही गटांनी जुळवून घ्यावे व सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अशी भावना व्यक्त केली.

बँकेचे पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुक संचालकांनी रोहोकले गुरुजींशी वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क साधला. मात्र गुरुजींनी शेवटपर्यंत आपल्या मनाचा थांगपत्ता कोणालाही लागू दिला नाही. यातूनच काही अनपेक्षित नावे पुढे आल्याने आपल्याला संधी मिळणार नाही असे समजून बँकेच्या पाच संचालकांनी गट करून तांबे गटाच्या सहा संचालकांशी हातमिळवणी केली.

अकरा लोकांचे बहुमत झाल्याने साहेबराव अनाप व बाळासाहेब मुखेकर यांना पदाधिकारी होण्याची संधी प्राप्त झाली. रोहोकले गटाचे नऊ संचालक वेगळे पडले. त्यातही अध्यक्षपदासाठी अनाप यांना 11 ऐवजी 12 मते मिळाल्याने रोहोकले गटाचे एक मत कमी झाले .याबाबतही जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा असून रोहोकले गुरुजींनी दिलेले उमेदवार सर्वमान्य झाले नाहीत किंवा बापू तांबे यांच्याबद्दलचे प्रेम कामी आले ? अशीही चर्चा जिल्ह्यात आहे. बँकेचे शताब्दी वर्ष सुरू असताना व त्यासाठी निधीची मोठी तरतूद केलेली असताना सुद्धा शताब्दीच्या कोणत्याही ठोस कार्यक्रमाचे नियोजन अद्याप होऊ शकलेले नाही. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा लवकरच होणार असून त्यापूर्वी दोन्ही गटाचे मनोमिलन होते की पुन्हा काही नविन घडामोडी घडतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .

जिल्ह्याच्या बँकेच्या राजकारणात राज्य शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांनी सुद्धा लक्ष घातल्यामुळे बंडखोरांना बळ मिळाले. त्यामुळे राज्यसंघाच्या भूमिकेबद्दलही जिल्ह्यामध्ये रोष व्यक्त केला जात असून राज्य संघाने जिल्ह्याच्या राजकारणात नाक खुपसू नये अशी बहुसंख्य गुरुमाउली प्रेमींची भावना आहे.

  • शिक्षक बँकेचे पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम यापूर्वीही अनेकदा झाला. मात्र त्यामध्ये बाह्य शक्तिंचा हस्तक्षेप कधीही झाला नाही. यावेळी मात्र एका गटाकडून जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांमार्फत तसेच इतर राजकीय नेत्यांकडून संचालकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न अकोले, पाथर्डी , कोपरगाव येथे करण्यात आल्यामुळे शिक्षक सभासदांमधून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे .
  • बँकेच्या एका संचालिकेने आपल्याच विरोधी गटातील एका संचालकाशी झालेल्या संभाषणाची क्लिप व्हायरल करून जिल्ह्यात धमाल उडवून दिली. या क्लिपमध्ये संबंधित संचालकांनी आर्थिक आमिष दाखवून मदत मागितल्याचे समजते. यावरून पारदर्शक कारभाराचा डांगोरा पिटणार्‍या गुरुमाउली मंडळाला अशी आर्थिक देवाण-घेवाण करण्याची भाषा शोभते का ? आणि रोहोकले गुरुजींनी हे कसे मान्य केले ? अशीही चर्चा जिल्ह्यातील शिक्षक वर्तुळात होत आहे.
  • गुरुमाउली मंडळात घडणार्‍या या घडामोडींकडे विरोधी गुरुकुल, सदिच्छा, इष्टा या मंडळाची नेते मंडळी बारकाईने लक्ष ठेवून असून या घडामोडींवर त्यांनी सध्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या नाहीत. हास्य सम्राट सुद्धा अद्याप गप्प आहेत. त्यामुळे येणार्‍या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी मंडळ सत्ताधार्‍यांना विरोध करणार की रोहोकले गटाला साथ देणार याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
  • बँकेत सत्तांतर झालेले नाही. गुरुमाउली मंडळाची सत्ता कायम असून मागील तीन वर्षात झालेल्या कारभारापेक्षाही चांगला कारभार सर्वांना विश्वासात घेऊन करण्याचा संकल्प गुरुमाउली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे व बँकेचे चेअरमन साहेबराव अनाप यांनी व्यक्त केला आहे.
  • रोहोकले वस्तीवर झालेल्या चिंतन बैठकीमध्ये उपस्थित जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी बँकेचे माजी पदाधिकारी असलेल्या त्रिकुटावर सडकून टीका करताना इतर सर्वांशी समेट करू मात्र या तिघांना आता दूर करा असा सूर आळवला. आता पुन्हा नवीन मंडळ किंवा नवीन संघटना काढण्याची कार्यकर्त्यांची तयारी नसून आपल्या गटाच्या नऊ संचालकांनी बँकेच्या कारभारावर चांगल्या प्रकारचा अंकुश ठेवावा अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
  • विकास मंडळ संकुलाचे बांधकामाचे कंत्राट देताना सुद्धा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, संचालक व विश्वस्त यांना विश्वासात न घेता सदरचे काम देण्यात आले असून बँकेनंतर आता विकास मंडळाकडेही लक्ष दिले जाणार असल्याची चर्चा शिक्षक वर्तुळातून होत आहे .
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!