राहुरी : गुहा येथे ऊस दरवाढीसाठी रास्ता रोको

0
आंदोेलकांवर गुन्हे दाखल, 10 जणांना अटक
राहुरी स्टेशन (वार्ताहर) – चारवेळा ऊस दरवाढीसाठी आंदोलन केल्यानंतरही साखर सम्राटांनी आंदोलकांना बैठकीचे ‘गाजर’ दाखविल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यार्ंंनी पोलीस आणि साखर कारखानदारांशी ‘पंगा’ घेत उसाला 3400 रुपये प्रतीटन भाव मिळावा, या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील गुहा येथे नगर-मनमाड राज्यमार्गावर तब्बल 5 तासापेक्षा जास्त काळ ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 10 कार्यकर्त्यांना राहुरी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा’ अशी घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुहा येथे काल गुरूवारी 12.30 वाजता रस्त्यावर उतरून नगर-मनमाड महामार्गावर उसाची वाहने अडवून 3400 रुपये उसाची पहिली उचल द्या, तरच वाहने सोडू अशी कणखर भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन सुरू केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, सतीश पवार, अरूण डौले, भागीरथ पवार, राहुल कर्पे, दिनेश वराळे, अनिल इंगळे, आसिफ पटेल, राजेंद्र शिंदे, तुषार शिंदे, विजय तोडमल, संदीप शिरसाठ, प्रमोद पवार, रामकृष्ण जगताप, दिलावर पठाण आदी आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले होते.
कारखान्याकडे जाणार्‍या उसाच्या गाड्या आंदोलकांनी अडविल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा, अशी घोषणाबाजी करीत आंदोलनकर्ते आक्रमक झाले. या मार्गावरून जाणारी सर्व उसाची वाहने अडविण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्या कडेने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची माहिती मिळताच पो. नि. प्रमोद वाघ हे फौजफाट्यासह आंदोलनस्थळी पोहोचले व त्यांनी आंदोलन थांबविण्याची विनंती आंदोलकांना केली.
मात्र, ऊस भावासाठी आतापर्यंत संघटनेने चारवेळा आंदोलन केले. परंतु प्रत्येकवेळी साखर कारखानदारांशी बैठकीचे आश्‍वासन मिळाले व एकाही बैठकीस कारखानदार उपस्थित राहिले नाही. त्यामुळे आता ‘तारीख पे तारीख’ आम्हाला नको, असे ठणकावून सांगत 3400 रुपये उसाचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, तुरूंगात बसू, परंतु आता माघार नाही, असा पवित्रा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेत आंदोलन थांबविण्यास नकार दिल्याने पोलीस हतबल झाले. पो. नि. वाघ यांनी शेवगाव गोळीबार प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत सावधगिरीने परिस्थिती हाताळीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांशी चर्चा करीत आंदोलन थांबविण्याची विनंती केली.
मात्र, आंदोलक ऐकण्यास तयार नसल्याने आणखी पोलीसबळ मागवून सायंकाळी 5:30 वाजता स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, सतीश बळवंत पवार, भगीरथ भारत पवार, अरूण डौले, सचिन नानासाहेब पवार, प्रवीण पवार, शरद निरंजन पवार, राहुल भरत पवार, गोपीनाथ कारभारी वर्पे यांना अटक करून राहुरी पोलीस स्टेशनला आणले. अंादोलकांच्या अटकेची माहिती मिळताच जि.प. सदस्य शिवाजीराजे गाडे यांनी पोलीस स्टेशनला धाव घेवून पो. नि. वाघ यांच्याशी चर्चा केली. यावेळी उपसभापती रवींद्र आढाव, उपस्थित होते.पोलिसांनी वरिष्ठांशी संपर्क केल्यावर कलम 135 प्रमाणे आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उसाला 3400 रुपये भाव देण्याच्या मागणीवरून नगर जिल्ह्यात आंदोलन चांगलेच पेटले आहे. शेवगाव येथे आंदोलकांवर केलेल्या गोळीबारानंतर आंदोलनाची ठिणगी जिल्हाभर पसरली आहे. मात्र, आडमुठ्या साखर सम्राटांनी शेतकर्‍यांच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आंदोलकांना दरवाढीबाबत बैठक घेण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ देण्याचा सपाटा लावल्याने शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आंदोलकांना अटक केल्यावर त्यांच्यावर कोणतीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको केला, म्हणून भा.दं.वि. 341 व गैरकायद्याची मंडळी जमवून वाहने अडविली. यासाठी कलम 143 तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले, म्हणून 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली पोलिसांनी चालविल्या होत्या. मात्र, शेवगावच्या गोळीबार प्रकरणातून पोळून निघालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या आदेशावरून 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*