राम शिंदे हे नापास मंत्री

0

बारामतीच्या ज्युनियर पवारांनी डागली तोफ

डांगेंनी भरला दारूगोळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- अलिकडेच राजकीय पटलावर उदय झालेले बारामतीचे ताजेतवाने युवा नेते रोहित राजेंद्र पवार यांनी पहिल्याच राजकीय कार्यक्रमात पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर आरोपांचा भडीमार केल्याने मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्‍नांचा हवाला देत रोहित यांनी एकप्रकारे पालकमंत्री राम शिंदे यांना नापास ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या राजकीय भडीमारात ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनीही आरोपांचा दारूगोळा भरण्यासाठी मदत केल्याने ‘कर्जत-जामखेड’ मतदारसंघातील आगामी लढतीचे चित्र स्पष्ट करण्यास मदत झाली आहे.

बारामतीच्या पवार घराण्यातील सर्वात तरुण राजकीय नेते आणि शरद पवार यांची खास मर्जी असलेला नातू म्हणून ओळख असलेले पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि खासगी साखर कारखान्यांची धुरा सांभाळणारे रोहित पवार यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघातील वावर अचानक वाढला आहे. शुक्रवारी ते कर्जत दौर्‍यावर होते. राष्ट्रवादीच्या शाखांचे उद्घाटन आणि फलकांच्या अनावरणाच्या निमित्ताने त्यांनी कार्यकर्त्यांशी थेट जुळवून घेण्याच्या मोहिमेला हात घातला. हे करताना त्यांनी पालकमंत्री  शिंदे किती निकामी आहेत, यावर जोर दिल्याने कार्यकर्त्यांनीही टाळ्या पिटत त्यांचा उत्साह वाढविला. रोजगार, सिंचन, विकास आणि गुंडगिरी असे सर्वच विषय हाताळत त्यांनी मतदारसंघाचा अभ्यास बर्‍यापैकी केल्याची जाणीव करून दिली.

रोहित पवार यांनी ना.शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, कर्जत-जामखेडच्या विकासात पालकमंत्री शिंदे यांचे योगदान काय? त्यांनी तालुक्यातील तरूणांना ना रोजगार दिला ना उद्योग आणले. मतदारसंघात शेतीच्या पाण्याचा विषय गंभीर आहे. गेल्या पाच वर्षात या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्‍या शिंदे यांना निवडणुका आल्यावर या समस्येची आठवण झाली. कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गुुंडगिरी पोसली जात आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डीसारखी गंभीर घटना हाताळण्यात मंत्री शिंदे अपयशी ठरले. जामखेड दुहेरी हत्याकांड ते आताच्या तौसिफ शेख आत्मदहन प्रकरणात शिंदे यांनी निव्वळ बघ्याची भुमिका घेतली. शिंदे हे मंत्री असूनही मतदारसंघातील जनतेसाठी, येथील प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी काहीच कसे करत नाहीत, असा सवाल पवार यांनी केला. मतदारसंघातील विकास आजही शून्यात अडकला आहे, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, ज्युनियर पवार हे मतदारसंघात तयारीनिशी आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ते या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी आजमावतील या चर्चेला बळ मिळाले आहे. मतदारसंघातील प्रश्‍नांच्या निमित्ताने या मतदारसंघाचे आमदार शिंदे यांना लक्ष्य करण्यात आल्यामुळे पवारांच्या तिसर्‍या पिढीतील वारस आगामी काळात अहमदनगरमधून पक्षाचे प्रतिनिधीत्व करण्याची शक्यता वाढली आहे. यावेळी पक्षातील अनेक जिल्हा आणि तालुका पदाधिकारी पवारांच्या दिमतीला होते.

पंकजा मुंडे घोषणा मंत्री! – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या देखील केवळ घोषणा मंत्री आहेत. मात्र, त्या माझ्या मित्राची कन्या असल्याने त्यांच्यावर अधिक बोलणे योग्य नाही, असेही डांगे यावेळी म्हणाले.

डांगेंचे शिंदेंना आव्हान
चोंडी येथील शाखा उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ नेते डांगे यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला. पुण्यश्लोक अहल्यादेवी यांच्या स्मारकाचा आराखडा 43 कोटी रुपयांचा होता. आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांनी सव्वा सहा कोटी, विजयसिंह मोहिते पाटील यांनी दीड कोटी आणि छगन भुजबळ यांनी सव्वा दोन कोटींचा निधी दिलेला आहे. शिंदे यांनी त्यांच्या काळात याठिकाणी किती कोटींचा निधी दिला याचा हिशोब द्यावा, असे आव्हान त्यांनी दिले. 

 

LEAVE A REPLY

*