मुंडे समर्थकांच्या नाराजीचा शिंदेंना फटका

0

सावरगाव मेळाव्यात विरोधात घोषणाबाजी : स्थानिक राजकारणावर परिणामाची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी) – एकाचवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे अशा दोन्ही गोटात वावरून राजकारण साधणारे पालकमंत्री राम शिंदे यांचा डाव मुंडे समर्थकांच्या लक्षात आल्याचे म्हटले जात आहे.
त्यामुळे संत भगवानबाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे झालेल्या मेळाव्यात मुंडे समर्थकांनी ना.शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे यांना या मेळाव्यात भाषणही करता आले नाही.
एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार सावरगाव घाट येथील मेळाव्यात ना.मुंडे यांनी उपस्थित म्हणून ना.शिंदे यांचे नाव घेताच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली.
त्यांच्या सत्काराप्रसंगीही मुंडे समर्थक त्यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी करत होते. त्यामुळे या मेळाव्यात भाषण ठोकण्याचा मनसुबा ना.शिंदे यांना गुंडाळून ठेवावा लागला.
दरम्यान, या नाराजीचा फटका ना.शिंदे यांना आगामी राजकारणात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जामखेड-कर्जत मतदारसंघात ना.मुंडे समर्थकांच्या पाठबळामुळेच ना.शिंदे यांचे राजकारण जिवंत आहे.
आधी स्व.गोपीनाथ मुंडे आणि आता ना.पंकजा मुंडे सातत्याने पाठराखण करत असल्याने त्यांच्या विधानसभेतील विजयाचा मार्ग सुकर होतो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून ना.पंकजा मुंडे यांचे खच्चीकरण करण्याचे राजकारण सुरू आहे. यात ना.शिंदे आपले योगदान देत असल्याचा संशय मुंडे समर्थकांमध्ये आहे.
भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी अचानक ना.मुंडे विरोधी भूमिका घेण्यास सुरूवात केली. गेल्यावर्षी वादंग झाल्यानंतर यावर्षी पुन्हा एकदा वाद झाला.
शेवटी ना.मुंडे यांनी मेळाव्याचे ठिकाणी बदलले. मात्र महंतांमागे कोणाचे पाठबळ आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. वाद होत असताना ना.शिंदे यांनी घेतलेली भूमिका मुंडे समर्थकांना रूचलेली नाही.
नगर जिल्ह्यातील महसूल आणि पोलीस प्रशासन एकप्रकारे मुंडे समर्थकांच्या विरोधात वापरले गेले, याकडे लक्ष वेधले जात आहे. पालकमंत्री म्हणून या व्यवस्थेवर ना.शिंदे यांचे नियंत्रण आहे. मुंडे विरोधामागे त्यांच्या पक्षीय विरोधकांचे तर बळ नाही, ही चर्चाही पुन्हा सुरू झाली आहे.
यापूर्वीही ना.मुंडे समर्थकांनी शिंदेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली तेव्हा ना.मुंडे विदेशात होत्या. मुंडे समर्थकांच्या नाराजीला घाबरून शिंदे यांनी नवा पदभार घेणे काही दिवसांसाठी टाळले होते.
आता पुन्हा एकदा मुंडे समर्थकांमध्ये ना.शिंदेंविरोधात नाराजीची लाट पसरली आहे. आगामी काळात जामखेड-कर्जत मतदारसंघात त्यांना याची राजकीय किंमत चुकवावी लागेल, अशी राजकीय कुजबूज सुरू झाली आहे.

 

LEAVE A REPLY

*