पालकमंत्र्यांशी अबोला नडला : व्दिवेदी नवे कलेक्टर, अर्दाड मनपा आयुक्त

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांची अवघ्या 11 महिन्यांत बदली झाली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी असणारा अबोल महाजन यांना नडला असून त्यामुळे त्यांची मुदतपूर्व बदली झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता नगरच्या जिल्हाधिकारीपदी वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांची बदली झाली आहे. यासह मनपा आयुक्त घनशाम मंगळे यांची बदली झाली आहे. मंगळे आता महानंदाचे संचालक म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्या जागेवर औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांची बदली झाली आहे.

2 मे 2017 ला महाजन यांची नागपूरहून नगरच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली होती. सुरूवातीपासून महाजन आणि पालकमंत्री शिंदे यांच्या फारसा संवाद नव्हता. यातून त्यांची बदली झाली आहे. महाजन आता उपसचिव तथा प्रकल्प संचालक पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मुंबई येथे काम करणार आहे. त्यांच्या जागेवर बदलून येणारे व्दिवेदी हे आयएसस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी, गोंदीया जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि वाशिम जिल्हाधिकारी पदावर काम केलेले आहे.

महाजन यांच्या बदलीचे वृत्त कळताच जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. पालकमंत्री शिंदे यांच्यामुळेच महाजन यांची बदली झाल्याची चर्चा महसूल प्रशासनात होती. मंगळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून मंगळे यांची बदली 9 ऑगस्ट 2017 ला नगर मनपा आयुक्तपदी बदली झाली होती. त्यांच्या कार्यकाळात मनपाचा 35 लाख रुपयांचा पथदिवे घोटाळा चांगलाच गाजला होता.

गेल्या महिन्यांत जिल्हाधिकारी महाजन यांनी राहुरी तालुक्यात वाळू तस्कार विरोधात मोठी कारवाई केली होती. या कारवाईत महाजन स्वत: सहभागी झाले होते. त्यावेळी 50 हून अधिक वाहने महाजन यांनी पकडले होते. मात्र, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे जिल्हाधिकारी यांना या कारवाईवर पाणी सोडण्याची वेळ आली होती. महाजन यांच्या मुदतपूर्व बदलीला ही कारवाई देखील कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

 

LEAVE A REPLY

*