Ground Report : करपलेलं पीक आणि शेतकऱ्याच्या म्हातारीचा हृदयरोग

रिपोर्टरची डायरी

0
सर्व छायाचित्रे : पंकज जोशी

पंकज जोशी | देशदूत डिजिटल

मनमाडवरून नांदगावच्या रस्त्याला लागलं की पानेवाडी गावाच्या अलिकडेच पेट्रोलियम कंपन्यांचे मोठमोठी गोडाऊन आणि प्रक्रिया केंद्रे आहेत. दररोज हजारो टँकर्स इंधन येथून नाशिक जिल्ह्यासह शेजारील औरंगाबाद, जळगाव जिल्ह्यांनाही पुरविले जातात. पैशांच्या भाषेत सांगायचे म्हणजे येथील दररोजची उलाढाल काही कोटी रुपयांच्या घरात जाते.

नांदगावकडे जाताना रस्त्यावरच या कंपन्या आणि त्यांचे टँकर नजरेस पडतात. या कंपन्यांच्या बरोबर समोर म्हणजे रस्ता ओलांडला की आपल्याला दिसते शेतात उभे असलेले आणि पाण्याअभावी जळालेले मक्याचे पीक.

काही शेतमजूर हा मका कापून ट्रॅक्टरच्या एका ट्रॉलीत भरत असतात. ‘हे पीक हातचं गेलं, पण जनावरांना चारा म्हणून होईल,’ एक शेतमजूर सांगतो. तेव्हा रस्त्याच्या समोरून लाखो रुपयांचे इंधन असलेले अनेक टँकर वेगाने जात असतात. त्यामुळे काही वेळ संवादात अडथळा येतो.

‘पहिला पाऊस पडला तेवढाच, पण नंतर झालाच नाही. मक्यानं कणसंही धरली नाही बघा’, तो आणखी माहिती पुरवतो.

या भागात जवळपास हीच स्थिती आहे. रस्ता चकाचक आणि शेतं मात्र कोमेजलेली. हे चित्र थेट नांदगाव शहरात प्रवेश करेपर्यंत नजरेस पडते.

पानेवाडीपासून दहाएक किलोमीटर अंतरावर हिसवळ गाव लागते. रेल्वे स्टेशनचे हे गाव आहे. दिवसाला दोन गाड्या येथे थांबतात. एक मुंबईहून येणारी आणि दुसरी मुंबईकडे जाणारी पॅसेंजर. हिसवळमध्ये शेतीचे दोन भाग पडतात. एक रस्त्याच्या पलिकडे आणि दुसरा अलिकडे.

अलीकडे काही विहिरींना पाणी होते. त्यामुळे मागच्या महिन्यापर्यंत ते कसेबसे पुरले. आता तर ते ही पाणी नाही. रस्त्याच्या पलिकडे तर या पेक्षाही भीषण अवस्था आहे.

टेकडीच्या कडेला असलेली येथील जमीन आधीच बरड, त्यात संरक्षित पाण्याची काहीच सोय नसल्याने येथील पिके हातची गेली आहेत. अशाच एका शेतात ५० वर्षीय विजय बाबुराव आहेर हे शेतकरी आपल्या बायका मुलांसह काम करत होते.

बाजरीचे करपलेलं पीक दाखविताना विजय आहेर

यंदा त्यांनी बाजरी पेरली, पण तिच्यात दाणेच भरले नाहीत. वाढही झाली नाही. विजय आहेर म्हणाले, ‘ एक हेक्टरवर बाजरी पेरली, पण नंतर पावसाने खूप ओढ दिली. त्यामुळं ती दीड ते दोन फूटच वाढली. दाणेही भरले नाहीत. आता जनावरांना चारा म्हणूनच ही उपयोगाला येईल.’

‘माझ्या कुटुंबात आम्ही सात ते आठ सदस्य आहोत. जनावरेही आहेत. मुले शाळेत जातात. शेतीवरच आमचा संसार चालतो. पण यंदा पोटापुरतेही धान्य झाले नाही. चाऱ्याचाही प्रश्न आहे. मागच्या वर्षी मला दहा ते १२ पोते बाजरी झाली होती.’

त्यांची पत्नी त्यातले त्यात हिरवी राहिलेली बाजरीचे ताटकें काढण्यात व्यस्त होती. तात्पुरती का होईना जनावरांच्या चाऱ्यासाठी बाजरीचा उपयोग होणार होता.

नांदगाव शहरापासून जवळच साकोरा नावाचे गाव आहे. इंजिनियअरिंगची पदवी घेतलेले बी.टी. बोरसे हे येथे शेती करत आहेत. ‘माझा एक मुलगा कॅलिफोर्नियाला असतो, मुलीही सासरी आहेत. मग निवृत्तीनंतर मी शेती करायचे ठरवले. माझा जन्म याच गावचा पण काही वर्ष बाहेरगावी होतो.’ ते सांगत होते.

ते म्हणाले की त्यांचे मका पीक संपूर्णपणे हातचे गेले. बाजरी आणि भूईमुगाचीही तीच गत झाली. विहीरीतही आता पाणी नाही. मुळात हा भाग कमी पावसाचा त्यात यंदा निम्माही पाऊस झाला नाही. त्यामुळे परिस्थिती बिघडल्याचे ते सांगतात.

‘नांदगाव शहरात फिरला, तर तुम्हाला दुष्काळाबद्दल तितकासा अंदाज येणार नाही. पण ग्रामीण भागात प्रत्यक्ष शेतांवर जा मग तुम्हाला त्याची दाहकता कळेल’ बोरसे सांगत होते.

यंदाचा मोसमी पाऊस नांदगावमध्ये तसा उशिराच सुरू झाला. त्यातही मनमाड वगळता तालुक्यातील चार महसूली मंडळांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमीच पाऊस पडला. परतीचा पाऊस तर झालाच नाही.

परिणामी मका, बाजरी, कापूस, भुईमुग अशा खरीप पिकांना दीड महिन्यांपेक्षा जास्त पाण्याचा ताण बसला आणि पिके हातची गेली. बाजरीने काही ठिकाणी कसाबसा तग धरला, पण एक दोन पोत्यांखेरीज शेतकऱ्यांच्या पदरात काहीच उत्पादन पडणार नाही.

मक्याचे पीक आणि आता लागवड केलेल्या कांद्याचे पीकही आता हातातून गेले आहे. खर्च वाया गेला तो वेगळाच. पिण्याच्या पाण्याचाही तालुक्यात प्रश्न निर्माण होणार आहे.

माणिकपुंज धरणातील सध्याचा खालावलेला पाणीसाठा

नांदगावसह तालुक्यातील काही गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या माणिकपुंज धरणात सध्या केवळ ६४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. आठ ते दहा दिवसांतून एकदा हे पाणी नांदगाव शहराला मिळते. सिंचनाचा तर प्रश्नच येत नाही. कारण प्रशासनाने आता हे धरण केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच राखीव ठेवले आहे.

नांदगावपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर औरंगाबाद रस्त्यावर हे धरण आहे. मन्याड नदीवर ३३५ दलघमी साठवण क्षमतेचा हा लघुप्रकल्प माणिकपुंज गावाजवळ आहे. धरणाच्या चारपाच किलोमीटरचा परिसर हिरवा दिसतो. या भागात काही शेतांमध्ये आधुनिक घरेही बांधलेली दिसतात. धरणाचे पाणी झिरपून येथील विहिरींना येते, त्यामुळे येथील शेती हिरवीगार राहिल्याचे शेतकरी सांगतात.

या धरणात थेट मोटारी टाकून पाईनलाईनद्वारे पाणी घेणारे शेतकरीही शेकडो आहेत. अलिकडेच सुमारे तीनशे मोटारी पाटबंधारे विभागाने जप्त केल्या.

प्रत्यक्ष  धरणावर गेल्यानंतर तेथील पाणी पातळी पाहून टंचाईचा अंदाज येतो. मागच्या वर्षी धरणाच्या बांधावरून पाणी वाहिले इतके पाणी होते. यंदा मात्र तशी स्थिती नाही. सगळीकडे धरणाचा तळ आणि मध्येच कुठेतरी थोडेसे पाणी दिसते.

त्या पाण्यावरूनही सध्या राजकारण सुरू आहे. धरणाकडे जाताना दिशादर्शक फलक असला, तरी प्रत्यक्ष धरणावर तशी काहीच माहिती दिसली नाही. याचे कारण एका पक्षाच्या आमदाराने हे धरण मंजूर केले आणि नंतर दुसऱ्या पक्षाच्या आमदाराच्या काळात ते बांधले. (अर्थात अजूनही ते पूर्ण झालेले नाही) त्यामुळे धरणावरील नामफलकाची फरशी रातोरात कुणीतरी काढून टाकल्याचे सांगितले जाते.

धरणाच्या भिंतीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका खोलगट भागात ४० ते ५० मोटारी पाईपसह नजरेस पडल्या. धरणातील पाणी शेतकऱ्यांनी परस्पर काढून घेऊ नये अशी सूचना आदल्याच दिवशी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेली असतानाही हा प्रकार सुरू होता. पाटबंधारे विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादानेच हा प्रकार चालतो असे येथील एका शेतकऱ्याने सांगितले.

असे असले तरी उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने मुळात या धरणात पाणी किती दिवस टिकणार? आणि त्यावर खरेच शेतकऱ्यांचा एक हंगाम भागणार का? याबद्दल शंकाच आहे.

नस्तनपूर देवस्थान परिसरात राखलेली हिरवाई

माणिकपुंजकडून नस्तनपूरच्या दिशेने जाताना वाटेत पुन्हा काही ठिकाणी दुष्काळाच्या झळा बसलेल्या दिसतात. कांदा करपलेला, तर मका सुकलेला. अनेक ठिकाणी या सुकलेल्या मक्याचीच चारा म्हणून वाहतूक होताना दिसली.

नस्तनपूरचे शनी मंदिर प्रसिद्ध आहे. शनिच्या साडेतीन पीठांपैकी एक म्हणून ते ओळखले जाते. येथे शनिवार आणि शनि-अमावस्येच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. आ. छगन भुजबळ मंत्री असतानाच्या काळात या मंदिराचा मोठा जीर्णोद्वार झाला. सद्या माजी. आ. अनिल आहेर हे संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस आहेत.

मंदिराचा चार एकर परिसर मोठमोठ्या झाडांनी वेढलेला आहे. या शिवाय परिसरात सुरेख बागही फुलविलेली आहे. त्यामुळे दुष्काळी नांदगाव तालुक्यात ही जागा आहे, यावर विश्वासच बसत नाही.

येथील व्यवस्थापकांनी सांगितले की मंदिर परिसरात दोन विहिरी आहेत. त्या कधी आटत नाहीत. शिवाय संस्थानचे दोन टँकरही आहे. कधी गरज लागली तर त्याचा उपयोग करतो. पण आम्ही पाण्याचा अतिशय काटेकोर वापर करतो.

येथून जवळच राजे खोज्या नाईक यांचा पुरातन किल्ला आहे. हा किल्ला ओलांडून पुढे न्यायडोंगरीच्या रस्त्याला लागताना परिसरातील हिरवाई कमी कमी होत जाते आणि पुन्हा पावसाने दिलेल्या ओढीचे चटके  पाहायला मिळतात.

या भागात कपाशीचे पीक घेतले जाते. न्यायडोंगरी गावाच्या तीन किलोमीटर आधी निवृत्ती मायाराम साळुंके यांचे शेत आहे. यंदा त्यांनी तीन एकरच्या क्षेत्रात कापसाच्या बीटी वाणाची लागवड केलेली आहे.

निवृत्ती मायाराम साळुंके यांचे शेत

आम्ही त्यांच्या शेतात गेलो तेव्हा ते आणि त्यांची पत्नी जमिनीवर बसून कापूस वेचताना दिसले. एरवी उभे राहूनच कापूस वेचतात. पण यंदा पाऊस कमी झाला आणि नंतर आलेल्या पाणीटंचाईमुळे दीड ते दोन फुटांपेक्षा कापूस वाढलाच नाही. जेवढा वाढला त्यालाच कैऱ्या आल्या आणि कापूस उगवला.

साळुंके म्हणाले,‘ या कापसासाठी मला ३५ हजार रुपये खर्च आला. पण आता दोन ते तीन क्विंटल उत्पादन येईल का नाही? शंकाच आहे. खर्चही वसूल होणार नाही. या कापसात त्यांनी तूरीच्या रांगा पेरल्या होत्या. तिलाही शेंगा आल्या नाहीत.

वयाची साठी ओलांडलेल्या साळुंके यांनी सोसायटीचे कर्ज काढून ही कपाशी केली होती. पण आता निसर्गापुढे ते हतबल झाले होते.  ते रोज आपल्या पत्नीसह इथे येतात. काही कापूस हाताला लागतो का? ते बघतात आणि मिळेल तो कापूस पोत्यात भरतात.

‘दोन दिवसांवर दसरा येणार, नंतर दिवाळी, सण कसा साजरा करायचा? घरात छोटी नातवंडे आहेत. त्यांना काय सांगायचे’ मागच्या वर्षी त्यांच्या कपाशीला बोंड अळीमुळे नुकसान झाले. त्याचे पंचनामे होऊन अद्यापही सरकारी मदत आली नाही. त्यात आता हे दुष्काळी नुकसान. शेतकरी कसा तग धरणार? असा सवाल ते करतात.

मका आणि कापूस ही खरे तर पाणी लागणारी पिके. कृषी तज्ज्ञ सांगतात की कोरडवाहू भागात ही पिके येत असली, तरी या पिकांना पाऊसाचे पाणी लागतेच. त्याऐवजी बाजरीला कमी पाणी लागते आणि पाण्याचा ताणही हे पीक सहन करू शकते.

पावसाने कपाशीची रोपे वाढलीच नाही आणि उत्पन्नही घटले. खर्च मात्र वाया गेला.

यंदा नाशिक जिल्ह्याचा विचार करता शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक बाजरीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. जिल्ह्यात बाजरीची पेरणी ६० टक्क्यांपर्यंत खाली आली. तर कपाशीची ९३ टक्के लागवड झाली. दुसरीकडे मक्याचे क्षेत्र ५० टक्यांनी वाढून १४८ टक्यांपर्यंत पोहोचले. त्यामुळे सर्वात जास्त नुकसान यंदा मका आणि कापूस उत्पादकांचे आहे. चांदवड आणि नांदगाव भागात अलिकडेच लागवड केलेला रांगडा कांदाही परतीचा पाऊस न आल्याने हातचा जाणार आहे.

कपाशीच्या लागवडीला हेक्टरी दहा ते बारा हजार रुपये जरी कमीतकमी खर्च धरला, तरी यंदा झालेली ४२ हजार ५३२ क्षेत्रावरील कपाशीसाठी शेतकऱ्यांचे सुमारे ४५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. कपाशीचे उत्पादन घटल्याने यंदा भाव सहा हजारावर पोहोचले आहेत. पण या भावाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे कपाशी आहेच कुठे? परिणामी नांदगाव आणि येवला परिसरातील शेतकऱ्यांवर या खर्च झालेल्या सुमारे ४५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे? तो त्याने सहन कसा करायचा? हा मोठाच प्रश्न आहे.

मक्याच्या पिकाची लागवड वाढल्याने शेतकऱ्यांचा खर्च ५० टक्यांनी वाढला आणि जोखीमही ५० टक्क्यांनी वाढली. मका पिकही जवळपास हातचे गेल्यामुळे शेतकऱ्यांचे दीडपट आर्थिक नुकसान झाले. आता हे सर्व कसे भरून काढायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे.

जवळच असलेल्या हिंगणे बेहरे या गावी शिवाजी बच्छाव हे शेतकरी राहतात.  ते गावातील माजी सरपंचही आहेत आणि गावातल्या सोसायटीचे चेअरमनही. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सोसायटीच्या कर्जाबद्दलचे बरेच कळीचे मुद्दे ते मांडतात.

ते म्हणाले की या सरकारने सन १५-१६ साठी कर्जमाफी योजना जाहीर केली. त्यामुळे निकषात बसणाऱ्या त्या वर्षीच्या शेतकऱ्यांचीच कर्जे माफ झालीत. सन १६-१७ या वर्षातील कर्जे काही माफ झाली नाहीत. मात्र या योजनेच्या अंमलबजावणी आणि प्रचारात बराच गोंधळ झाला. शेतकऱ्यांचे गैरसमज झाले. अनेकांना वाटले की आपले सर्वच कर्ज माफ होईल. म्हणून काहींनी बायकोचे दागिने विकून, तर काहींनी जमिनी गहाण टाकून कर्ज भरली. पण प्रत्यक्षात कर्जमाफी त्यांना मिळालीच नाही.

‘आता त्यातही एक पुन्हा मेख आहे’, ते सांगू लागले, ‘सरकारच्या आवाहनानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी १६-१७ची थकबाकी भरली, पण त्यांना पुन्हा कर्ज मिळालेच नाही. एकूणच कर्जमाफी या प्रकाराबद्दल शेतकऱ्यांमध्ये गोंधळ आहे. सरसकट कर्जमाफी द्यायला हवी असे शेतकऱ्यांना वाटते.’

शिवाजी बच्छाव

गावातील सोसायट्यांची धनको बँक आहे जिल्हा बँक. पण नोटबंदीनंतर नाशिक जिल्हा बँक अडचणीत आली. इतकी की ज्या शेतकऱ्यांच्या मुदतठेवी बँकेत होत्या, त्या अजूनही त्यांना काढता येत नाही. आता कर्जाच्या बाबतीतही एक गंमत आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांना म्हणते आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, पण ती रक्कम तुमच्या हातात देणार नाही. त्याऐवजी आम्ही तुमच्या नावाने एफडी करू. त्यावर आठ टक्के प्रमाणे व्याजदर मिळेल. सोसायटीचे कर्ज ६ टक्के व्याजदराने मिळते. ते तुम्ही घ्या आणि जिल्हा बँकेच्या या एफडीतूनच ते वळते होईल. तुमचा दोन टक्के व्याजदराचा फायदाच होईल. बच्छाव यांचे हे अनुभवाचे बोल शेतकऱ्यांना कर्जवाटप पद्धत, जिल्हा बँका आणि सोसायट्यांची कार्यप्रणाली, कर्जमाफीचे सरकारी वास्तव आणि सध्याची डबघाईला आलेली शेती व शेतकऱ्याची स्थिती या बद्दल बरेच काही सांगून जाते.

‘यंदा शेतकरी हवामान अंदाजावर अवलंबून राहिला. पण परतीचा पाऊस आलाच नाही. इतकेच काय पण खरीपातही पाऊस आला नाही. दुसरीकडे शेतकऱ्याने मका, कापूस ही पिकपद्धत कायम ठेवली, त्यासाठी कर्जबाजारी झाला. आता तर तो अत्यंत निराश आहे.’

बच्छाव यांच्यासोबत असलेले दुसरे एक शेतकरी सांगत होते. ‘हवामान अंदाजाबाबत सरकारी हवामान खाते आणि स्कायमेटसारख्या कंपन्यांनी आमची दिशाभूल केली. शेतकरी त्यांना माफ करणार नाही,’ ते कळकळून बोलत होते.‍

कापसाचे व्यापारी प्रकाश बटारीलाल पितडिया

दसऱ्यापर्यंत साधारणत: खरीपातील बाजरी, कापूस विक्रीसाठी बाजारात येतो. न्यायडोंगरीचे वयोवृद्ध व्यापारी सुभाषचंद्र दुगड यांची प्रतिक्रिया मोठी मार्मिक होती. ‘शेतकऱ्याच्या घरात, तर व्यापाऱ्याच्या दारात’, ते म्हणाले. मी शेतकऱ्यांकडून बाजरी व इतर धान्य खरेदी करतो. पण यंदा त्यात ५० टक्क्यांनी घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

याच भागात असलेले कापसाचे व्यापारी प्रकाश बटारीलाल पितडिया सांगतात की यंदा त्यांच्याकडे येणाऱ्या कपाशीत निम्म्याहून अधिक घट झाली आहे. दसऱ्यापासून शेतकरी कपाशी विक्रीला आणतात. दर वर्षी हप्त्याला साधारणत: १५० क्विंटल कापसाची ते खरेदी करतात. पण यंदा दसरा आला तरी जेमतेम ४० क्विंटलच कापूस त्यांना शेतकऱ्यांनी विकला आहे.

ते म्हणाले, ‘ सहा हजार भाव सध्या आहे. पुढे तो आणखीही वाढेल, पण शेतकऱ्यांकडे कापूसच नाही पिकला. जो पिकला त्याचाही दर्जा खालावला आहे. तुम्ही जर मागच्या वर्षी दसऱ्याच्या टायमाला आला असता, तर या गावातून मोठ मोठ्या ट्रक भरून कापूस बाहेरगावी जाताना बघितला असता.’

वाहेगाव परिसरात करपलेला कांदा

नांदगावहून परतताना चांदवडजवळच्या वाहेगाव परिसरात सत्तरीच्या आसपास वय असलेले मच्छिद्र फाफाळे हे शेतकरी भेटतात. नेहरू शर्ट, धोतर, टोपी आणि गळ्यात उपरणे असा त्यांचा पोशाख असतो. सोबत त्यांची नऊवारीतील वृद्ध पत्नी आणि छोटी नातही असते.

ते म्हणाले ‘आमच्या कडचा कांदा पूर्ण झोपला. खूप नुकसान झाले. कांद्याची स्थिती काय आहे, हे तुम्ही शेतात पाहतच आहात.’ ते थोडे गडबडीत होते. त्यांना तातडीने लासलगावजवळ जायचे होते. म्हणाले एका कार्यक्रमाला जायचेय. तिथून पुढे म्हातारीला सरकारी दवाखान्यात न्यायचंय.

काय झाले आजींना? ’ या प्रश्नावर ते म्हणाले की तिला खूप दम लागतो. छातीत दुखतं तिच्या.

‘मग सरकारी दवाखान्यात का?’ नाशिकला चांगल्या दवाखान्यात दाखवा. ते हृदयाची सोनोग्राफी करतील. चांगला उपचार होईल, असे त्यांना सुचविले.

‘तिथं सरकारी दवाखान्याप्रमाणं मोफत इलाज करणारा दवाखाना आहे का?’ बाबा रे आम्हाला काही महाग दवाखाना परवडत नाही.

त्यांचा हा प्रश्न आपल्याला निरुत्तर करून जातो. एकीकडे पाणी नसल्याने मोठा खर्च करून लागवड केलेला कांदा जळालाय, त्या दु:खाचे सल मनात आहे. दुसरीकडे आपल्या जिवाभावाच्या माणसाला उपचार म्हणून जीव जळतोय, त्याचीही घालमेल होतेय.

मच्छिंद्र फाफाळे यांच्यासारख्या लाखो शेतकऱ्यांची ही प्रातिनिधीक व्यथा सहजपणे शेतकऱ्याचे दु:ख कथन करतेच, पण व्यवस्थेवर सणसणीत कोरडाही ओढून जाते. पुढचे प्रश्न अर्थातच आपल्या मनात राहतात आणि खिन्नपणे आपण तेथून पुढच्या वाटेला लागतो.

LEAVE A REPLY

*