नाशिक जिल्ह्यातून १.१७ लाख टन द्राक्ष निर्यात

0

लासलगाव । (हारुण शेख) : द्राक्ष्यांची पंढरी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून या हंगामात 1 लाख 17 हजार टन द्राक्षांची निर्यात झाल्याची नोंद झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत 8 हजार टन जादा द्राक्ष निर्यात झाली आहे.

युरोपमध्ये चिली द्राक्षांचे या वर्षांपासून दमदार आगमन झाल्याने भारतातील द्राक्षांचे युरोप आणि रशियामधील दर घसरले आहे. या वर्षी द्राक्ष उत्पादनात वाढ झाली असली तरी बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.

देशाला परकीय चलन मिळवून देणारे द्राक्ष हे प्रमुख पीक आहे. यावर्षी युरोपमध्ये द्राक्ष निर्यात 100 रुपये किलोवरून 40 रुपये किलोपर्यंत आली आहे. रशियामध्ये सुद्धा द्राक्ष हे मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने तिकडेसुद्धा द्राक्ष हे 60 रुपये किलोवरून 30 रुपये किलोपर्यंत आले आहे.

यापूर्वी चिली हा देश फक्त युकेमध्ये द्राक्ष निर्यात करीत होता. या वर्षांपासून सिलीने आपली द्राक्ष हे युरोप आणि रशियामध्ये सुद्धा निर्यात सुरू केल्याने भारताच्या द्राक्षाचे दर कमी झाले आहे. या हंगामात नाशिक जिल्ह्यातून 1.17 लाख टन द्राक्षांची निर्यात झालेली आहे. जीईएआयच्या माहितीनुसार या हंगामात जिल्ह्यातून द्राक्षांची निर्यात 8 टक्क्याने वाढलेली आहे.

जिल्ह्यातून 56 हजार एकरमध्ये द्राक्ष लागवडीची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातून द्राक्षाची 1 लाख 8 हजार टन निर्यात झालेली होती. त्यापैकी 75 हजार टन द्राक्ष हे युरोपमध्ये आणि 33 हजार टन द्राक्ष हे रशिया, बांगलादेश, दुबईमध्ये पाठवले गेले होते.
निर्यात वाढूनही भाव नाही : यावर्षी निसर्गाने चांगली साथ दिल्याने द्राक्षाचे उत्पादन दर्जेदार निघाले. मात्र सध्या 12 ते 14 रुपये किलोने भाव मिळत असल्याने निर्यातीत वाढ जरी झाली असली तरी शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आहे.
गुणवत्तेमुळे मागणीत वाढ : सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादन खर्च आणि मजूर टंचाई या अडथळ्यांवर मात करीत जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावतच ठेवली आहे. गोड चवीच्या रसाळ आणि करकरीत द्राक्षांनी केवळ गुणवत्तेच्या जोरावर जागतिक बाजारात स्थान निर्माण केले असून दरवर्षी भारतातील, विशेषत: नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना मागणी वाढतीच आहे.
सतत सुधारणेवर भर : देशाच्या तुलनेत 90 टक्के द्राक्ष निर्यात महाराष्ट्रातून होत असताना त्यातील 70 टक्के निर्यात नाशिक जिल्ह्यातून होते. द्राक्ष उत्पादकांनी गुणवत्तेचे निकष पाळून सातत्याने सुधारणा करीत दर्जेदार उत्पादन निर्मितीवर भर दिला आहे.

अपेडा’चे ग्रेपनेट, राज्य शासनाचा कृषी विभाग, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले द्राक्ष गुणवत्ता अभियान’ या बाबींचा एकत्रित परिणाम द्राक्षांची गुणवत्ता उंचावण्यास झाला आहे.

यामुळे जागतिक बाजारात भारतीय द्राक्षांबाबत विश्वासार्हता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सर्वांधिक द्राक्ष उत्पादन निफाड तालुक्यात होते. त्यामुळे डिसेंबरपासूनच तालुक्यात द्राक्षहंगाम गजबजून जातो. मात्र कधी गारपीट, कधी पाणीटंचाई तर कधी नैसर्गिक आपत्ती आदींचा द्राक्षबागेला फटका बसून शेतकर्‍याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आज प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष पिकवूनही त्याला बाजारभाव मिळत नाही.

LEAVE A REPLY

*