वातावरणीय बदलामुळे शेतकरी धास्तावले; द्राक्षबागा वाचविण्यासाठी वाढला खर्च

0
खेडगाव | वातावरणात दोन दिवसापासुन अचानक बदल झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. काल सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकरी राजाच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावून घेतला जातो कि काय या भितीने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होताना दिसत आहे.

आधीच भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना परतीच्या पावसामुळे द्राक्षबागाची संपुर्ण वाताहत केली  आहे. परतीच्या पावसामुळे निम्म्याहून अधिक द्राक्षबागा संपुष्टात आल्या आहेत तर काही द्राक्षबागाना कुऱ्हाड लावली. अशा परिस्थितीत राहिलेल्या द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असताना अचानक अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची झोप उडवली आहे.

अवकाळी पाऊस व थंडगार हवा असल्याने परिपक्व असणाऱ्या द्राक्ष मण्यांवर तडे जाण्याची भीती आहे  तर उशीरा छाटणी झालेल्या द्राक्षबागांमध्ये डाऊनी, करपा, भूरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. फुलरा अवस्थेतील द्राक्षबागेचे नुकसान होण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान वाचविण्यासाठी औषध फवारणीचा खर्च वाढणार असुन उत्पादन हातचे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आधीच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सुरवातीला महावितरण कंपनीने भारनियमनात वाढ करून अंधारात ठेवून चुकीचे बिल  माथी मारून  सक्तीची वसुली करण्यात आली . भारनियमनामुळे वेळेत पिकांना पाणी देणे व औषध फवारणी साठी पाणी उपलब्ध न झाल्याने डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव वाढुन द्राक्षबागाचे मोठे नुकसान झाले त्यामुळे द्राक्षबागाना कुऱ्हाड लावण्याचा प्रसंग शेतकर्‍यांवर ओढवला.

सलग दहा दिवस चालणाऱ्या परतीच्या पावसामुळे द्राक्षबागा मध्ये पाणी साचल्याने उशीरा छाटणी झालेल्या  द्राक्षबागामध्ये घड जिरून हातचे उत्पादन गेले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादन निम्म्याहून अधिक घटले असुन अवकाळी पावसाने उर्वरित द्राक्षबागाचे उत्पादन हातचे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पिक वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असुन महावितरण कंपनीने भारनियमनाचे वेळापत्रक बदलून बिलामध्ये दुरूस्ती करून सक्तीची वसुली थांबवावी. नैसर्गिक आपत्ती सामोरे जाण्याचा प्रसंग शेतकर्‍यांवर ओढवला असून अजूनही शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी खेडगाव परिसरातील  शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*