115 गावांना ग्रामसेवकांची प्रतीक्षा

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – गावपातळीवर शासनाचा महत्त्वाचा घटक समजल्या जाणार्‍या ग्रामसेवकांची 115 गावांना प्रतीक्षा आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची गावपातळीवर अंमलबजावणी करण्याबरोबरच ग्रामस्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध कार्यालयांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवक भाऊसाहेबांची असते.
मात्र, त्या गावांना कायमस्वरुपी ग्रामसेवक नसल्याने विविध विकास कामांना खोडा बसत आहे.एकापेक्षा अधिक गावांत प्रभारी काम करणार्‍या ग्रामसेवकांची चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मूळ सेवेच्या ठिकाणच्या कामांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत गाव पुढार्‍यांकडून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जात असला तरी,सध्याची रिक्त पदांसाठी नव्याने भरती नसल्याने संबंधित ग्रामसेवकाला प्रशासकीय कार्यवाहीनुसार प्रभारी गावात काम करणे भाग पडत आहे. सध्या शासनाकडून ग्रामपंचायती अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजना मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहेत.
त्यामुळे दिवसेंदिवस ग्रामपंचायतींना अधिक महत्त्व प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे. 14 व्या वित्त आयोगाचा 95 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जिल्ह्यातील 1311 ग्रामपंचायतींना देण्यात आला. मात्र, ग्रामसेवक नसलेल्या ठिकाणी कामांचा आराखडा कागदोपत्री असून प्रत्यक्षात खर्च कमी असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायत विभाग अनभिज्ञ – 
ग्राम विकासाचा महत्त्वाचा घटक म्हणून ग्रामसेवक शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो.मात्र, बहुतेक गावांना ग्रामसेवक भाऊसाहेबच नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे.याबाबत प्रशासनाकडे रिक्त पदांची माहिती अद्ययावत नाही.हे विशेष. यावरून महत्त्वाच्या प्रश्‍नाबाबत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग अनभिज्ञ असल्याचे उघड झाले आहे.

जिल्ह्यातील मोठ्या गावांना ग्रामसेवकांऐवजी ग्रामविकास अधिकार्‍यांची नियुक्ती केली जात आहे. मात्र, जिल्ह्यातील मोठ्या 13 गावांना ग्रामविकास अधिकारी नसल्याने विविध कामांना ब्रेक मिळत आहे.

LEAVE A REPLY

*