ऑनलाईन जन्म-मृत्यू नोंदणीकडे ग्रामसेवकांंची पाठ

0

जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची गटविकास अधिकार्‍यांना नोटीस 

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्यावर्षीपासून जन्म-मृत्यूच्या नोंदी गावपातळीवर ग्रामसेवकांनी ऑनलाईन घेण्याचे आदेश असतांनाही जिल्ह्यात याकडे कानाडोळा झाला आहे. जन्म-मृत्यांच्या आकडेवारीत अचुकता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यावर अंमलबजावणी होतांना दिसत नाही. जन्म-मृत्यूच्या नोंदी ऑनलाईन न नोंदवणार्‍या गटविकास अधिकार्‍यांना जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी नोटीसा बजावल्या आहेत.
गावात जन्मलेल्या बालकांची ऑनलाइन नोंद करणे ग्रामपंचायतींना बंधनकारक असतांना या कामात ग्रामपंचायतींनी टाळाटाळ चालवली आहे. नोंदी ऑनलाइन घेण्याच्या कामात ग्रामसेवकांकडून हलगर्जीपणा केला जात असल्याने नोंदीचे काम मागे पडले आहे. मागील वर्षभरात 63 हजार 382 जन्माच्या नोंदी ऑफलाइन घेण्यात आल्या असून यातील अवघ्या 26 हजार 450 नोंदी ऑनलाइन झाल्या आहेत. या कामात टाळाटाळ होत असल्याने देशातील जन्म मृत्यूच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने सॉफ्टवेअर तयार केले आहे.
या सॉफ्टवेअरमध्ये नोंदी घेण्याचे काम फेब्रुवारी 2016 मध्ये सुरू झाले. या सॉफ्टवेअरमध्ये नोंदी कशा करायच्या याचे प्रशिक्षण ग्रामसेवकांना देण्यात आले. त्यानंतर या नव्या पद्धतीत कामकाजास सुरुवात झाली. ग्रामपंचायतीमध्ये या ऑनलाइन नोंदी होणे अपेक्षित असताना ग्रामसेवकांकडून कामाचा वेग मंदावला आहे.
जन्माच्या नोंदी कागदावर घेतल्या जात असल्या तरी ही माहिती सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्याची तसदी ग्रामसेवक घेत नसल्याचे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. ग्रामसेवकांकडूनच टाळाटाळ होत असल्याचा आरोप आरोग्य अधिकार्‍यांनी केला आहे. त्यामुळे जानेवारी 2016 ते डिसेंबर 2016 या वर्षभरात अवघ्या 26 हजार 450 नोंदी ऑनलाइन झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकार्‍यांकडून मागवलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाने गटविकास अधिकार्‍यांना याबाबत नोटीसा बजावल्या असून बीडीओ आता ग्रामसेवकांवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

  विरोधाभास म्हणजे जिल्हा पातळीवर असणार्‍या जन्म-मृत्यू नोंदणी समितीचे अध्यक्ष संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. या समितीचे सदस्य सचिव महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असून जन्म-मृत्यूची  नोंद घेणारे ग्रामसेवक हे ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी आहेत. यात कोठेही आरोग्य विभागाला  सहभागी केलेले आहेत. यामुळे आरोग्य विभागाचे या नोंदणीशी  थेट संबंध येत नसल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

*