Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : स्वच्छता संदेश रंगवण्यासाठी ग्रामसेवक पेंटरच्या शोधात

Share
सिन्नर | अजित देसाई
शासनाच्या निर्देशाने स्वच्छ भारत  अभियानांतर्गत दि.1 ते 30 जुलै दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येक गावात सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर स्वच्छता संदेश लिहिण्याची व हागणदारीमुक्त गावाचा बोर्ड लावण्याची विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या आहेत.
केंद्र शासनाने तयार केलेल्या स्वच्छता दर्पण या मूल्यांकनात यासाठी 25 गुण ठेवण्यात आले आहेत. शासनाकडून अति तात्काळ स्वरूपाचा हा आदेश प्राप्त झाल्यावर स्वच्छता संदेश रंगवण्यासाठी पेंटर चा शोध घेण्याची वेळ ग्रामसेवकांवर आली आहे.
केंद्र शासनाने भिंतीवर संदेश लिहिणे व हागणदारीमुक्त गावाचा बोर्ड लावण्यासाठी सर्व जिल्ह्यांना डिझाइन्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसारच सदरचे काम प्रत्येक महसूली गावात करण्याची सूचना आहे. गावात सार्वजनिक ठिकाणी 4 चित्रमय स्वच्छता संदेश रंगवणे आवश्यक असून त्यासाठी 6 बाय 4 या  आकाराच्या चित्रासाठी ऑईल पेंटसारख्या पक्क्या रंगाचा वापर करणे बंधनकारक आहे.
याशिवाय ग्रामपंचायत कार्यालयाच्या लगत 1 लोखंडी किंवा सिमेंटचे बांधकाम केलेल्या फलक लावणे आवश्यक असून 4 बाय 3 या आकारात ऑईल पेंट सारख्या पक्क्या रंगाने तो रंगवणे गरजेेेचे आहे. जिल्हा परिषद स्तरावरुन पंचायत समिती मार्फत प्रत्येक गावातील ग्रामसेवकांना या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निर्धारित केलेल्या डिझाईन मध्ये फलक रंगवणे आवश्यक असल्याने व त्यासाठी ऑईल पेंट रंगांचा वापर करणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे एरवी प्रत्येक ठिकाणी डिजिटल फ्लेक्स वापराची सवय लागलेल्या ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना आता पेंटरचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
सिन्नरचा विचार करता तालुक्यातील 128 गावांमध्ये एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात येत असल्याने पेंटर चा जणू तुटवडा जाणवू लागला आहे. डिजिटल क्रांतीमुळे रोजगार हिरावला गेल्याने चित्रकारीची कला अवगत असणाऱ्या बहुसंख्य कलाकारांनी अन्य व्यवसाय शोधले. त्यामुळे चित्र रंगवण्याची कला आता हातावर मोजता येणाऱ्या लोकांनाच आत्मसात आहे. मात्र शासनाकडून आदेश आल्याने चित्र रंगवणाऱ्या पेंटर चा शोध घेत वणवण करण्याची वेळ ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर आली आहे.
एका चित्राचे सरासरी हजार रुपये मानधन या पेंटर्सना देण्यात येत आहे. एका गावात किमान पाच ठिकाणी चित्र रंगवायचे असल्याने व त्यासाठी मोठा वेळ लागत असल्याने पेंटर्सची देखील दमछाक होत आहे. कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असला तरी दोन हातांनी किती काम करायचे असा प्रश्न या पेंटर्स समोर निर्माण झाला आहे.
अनेक ठिकाणी तर ग्रामसेवकांकडून बिदागी वाढवून देण्याचे आमिष देखील पेंटर्सला दाखवले जात आहे. गावात रंगवलेले स्वच्छता चित्रे फोटो काढून शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे लागत असल्याने आपण त्यात मागे राहू नये यासाठी ग्रामसेवकांची धडपड यातून दिसून येत आहे.
ग्रामपंचायतींना 14 हजार खर्च करण्याची मुभा …. 
भिंतीवर स्वच्छता संदेश रंगवणे व हागणदारीमुक्त गावाचा बोर्ड लावण्यासाठी जिल्ह्याकडे आवश्यक निधी नसल्याने नाशिक जिल्हा परिषदेकडून शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली. आहे मात्र दि.30 जुलै पर्यंत हे काम पूर्ण करणे आवश्यक असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांच्याकडील स्वनिधीतून 14 हजार 300 रुपयांच्या मर्यादेपर्यंत खर्च करण्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी मुभा देण्यात आली आहे.
मूल्यांकनात मागे राहिल्यास जबाबदारी  गट विकास अधिकाऱ्यांची
सदर मोहिमेचे वेळेत काम पूर्ण करून घेण्यासाठी ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यांची त्यांच्या बेटातील ग्रामपंचायतींसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी ग्रामपंचायतीकडून सदरचे काम पूर्ण करून घ्यावे व शासनाच्या संकेतस्थळावर त्याचे जिओ टॅगिंग करण्याच्या कामाचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून याकडे दुर्लक्ष केल्यास किंवा विहित वेळेस काम पूर्ण न केल्यास व त्यामुळे जिल्ह्याला स्वच्छता दर्पणच्या मूल्यांकनात कमी गुण मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. या कामात हलगर्जीपणा दाखवल्यास संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!