Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

ग्रामसेवकांकडील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी समिती नियुक्त

Share

ग्रामसेवक युनियनच्या आंदोलनाला यश : संप काळात पगारही मिळाला

अहमदनगर (प्रतिनिधी) – गाव पातळीवर काम करणार्‍या ग्रामसेवकांकडे मोठ्या प्रमाणात कामाचा बोजा आहे. यामुळे ग्रामविकास विभाग सोडून अन्य विभागाची अतिरिक्त कामे ग्रामसेवकांकडून काढून घेण्यात यावीत, यासह अन्य मागण्यासाठी राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने राज्यभर 22 दिवसांचे आंदोलन केले होते. याची दखल घेत राज्य सरकारने ग्रामसेवक यांच्याकडे असणार्‍या कामाचा आढावा घेण्यासाठी राज्य पातळीवर समिती गठीत केली आहे. ही समिती अभ्यास करून ग्रामसेवकांच्या कामाचे मुल्यमापन करणार आहेत.

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या वारंवार अतिरिक्त कामे दिले जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. तसेच या कारणावरून राज्य ग्रामसेवक युनियनने गेल्या महिन्यांत सलग 22 दिवस काम बंद आंदोलन पुकारत सरकारविरोधात असहकार आंदोलन पुकारले होते. युनियनचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. अखेर सरकारने ग्रामसेवकांच्या मागण्या मान्य करत आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते.

त्यानंतर राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने 19 सप्टेंबरला आदेश काढत राज्य पातळीवरून ग्रामसेवकांच्या कामाचे मुल्यमान करण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीत अध्यक्ष म्हणून ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव अध्यक्ष असून दोन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, दोन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दोन उपमुख्य कार्यकारी अथवा गटविकास अधिकारी यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. समिती अभ्यास करून आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. त्यानूसार ग्रामसेवकांच्या कामात फेरबदल होणार आहेत.

ग्रामसेवक युनियनने केलेल्या आंदोलनाचे हे मोठे यश असून यामुळेच राज्य सरकारने समिती गठीत केली असल्याचे युनियनचे राज्याचे अध्यक्ष ढाकणे यांनी सांगितले. यासह सरकारने ग्रामसेवकाच्या 22 दिवसांच्या काळातील पगार दिला असून रजा देखील भरून घेतल्या असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!